उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथे आयोजित महाकुंभ मेळ्याचा महाशिवरात्रीच्या दिवशी म्हणजेच बुधवारी समारोप झाला. देश- विदेशातून भाविकांनी महाकुंभमध्ये सहभागी होत पवित्र स्नान केले. यानंतर आता प्रयागराजमधून एक धक्कादायक बाब समोर येत आहे. महाकुंभमेळ्याच्या समाप्तीच्या एका दिवसानंतर, गुरुवार, २७ फेब्रुवारी रोजी प्रयागराज शहरातील दरियाबाद परिसरात हिंदू व्यावसायिकाच्या घराबाहेर एका गायीचे अवशेष आढळल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
दारीयाबाद परिसरात राहणारे गोपाल अग्रवाल नावाच्या एका हिंदू व्यावसायिकाच्या घराबाहेर गायीचे शिर आढळून आले तर दीपक कपूर नावाच्या दुसऱ्या हिंदू रहिवाशाच्या घराबाहेर गायीचा पाय सापडला. या घटनेवरून परिसरात गोंधळ उडाला आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक लोक आणि हिंदू हक्क गट विश्व हिंदू परिषदचे सदस्य देखील परिसरात जमले. तर, कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून तीन वेगवेगळ्या पोलिस ठाण्यांचे पथक घटनास्थळी पोहोचले आहेत. पशुवैद्यकीय डॉक्टरांच्या पथकानेही प्राथमिक तपासणी केली आणि मृत गायीचे अवशेष ताब्यात घेतले आहेत.
हे ही वाचा :
उत्तराखंडमध्ये बर्फाखाली अडकलेल्या ४७ कामगारांची सुटका; ८ कामगारांचा शोध सुरू
ट्रम्प विरुद्ध झेलेन्स्की: शांतता, युद्धाच्या मुद्द्यावरून झाली बाचाबाची
ट्रम्प यांच्याशी झालेल्या शाब्दिक चकमकीनंतर झेलेन्स्की यांचा माफी मागण्यास नकार
पत्नीच्या जाचाला कंटाळून आग्रा येथील तंत्रज्ञाची आत्महत्या; मृत्युपूर्वी बनवला व्हिडीओ
घटनेनंतर गोपाल अग्रवाल यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आरोपींना पकडण्यासाठी तपास सुरू करण्यात आला आहे. पोलीस अधिकारी संजय द्विवेदी यांच्या मते, जातीय तेढ निर्माण करण्याच्या उद्देशाने ही घटना घडवून आणण्यात आली होती. तक्रारदार गोपाल अग्रवाल यांच्या मते, गेल्या पाच महिन्यांत गायींच्या विच्छेदनाची ही तिसरी घटना होती. त्यांनी माहिती दिली की दोन घटनांमध्ये त्यांच्या घराबाहेर मृत गायीचे अवशेष आढळले होते परंतु पोलिसांनी कोणतीही कारवाई केलेली नाही.