बुधवार, १३ डिसेंबर रोजी लोकसभेचे कामकाज सुरू असताना दोन तरुणांनी प्रेक्षक गॅलरीतून अचानक सभागृहाच्या मजल्यावर उडी मारली आणि पिवळा धूर फवारला. संसदेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या २२ व्या वर्धापनदिनानिमित्त नव्या संसद भवनात या घटनेने गोंधळ उडाला. दरम्यान, एका महिलेसह दोघांनी संसदेबाहेर धूर पसरवून गोंधळ घातला. यानंतर पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले आहे.
दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने संसद भवनाच्या सुरक्षेतील त्रुटी प्रकरणी बेकायदेशीर कारवाया (प्रतिबंध) कायदा म्हणजेच UAPA कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात एकूण सहा आरोपी आहेत. पाच जणांची ओळख पटली आहे. चौघांना ताब्यात घेतले आहे. उर्वरित दोघांच्या अटकेसाठी प्रयत्न सुरू आहेत.
बुधवारी लोकसभेत शून्य तास संपत आला होता. खासदार खगेन मुर्मू आपला मुद्दा मांडत होते तर, राजेंद्र अग्रवाल सभेचे संचालन करत होते. त्यानंतर अचानक प्रेक्षक गॅलरीतून एका प्रेक्षकाने सभागृहात उडी मारली आणि खासदारांच्या टेबलांवरून पुढे गेला. हा प्रकार पाहून खासदारांनीही प्रेक्षकांना घेराव घालून बेदम मारहाण केली. त्यानंतर आणखी एका तरुणाने व्हिजिटर गॅलरीच्या रेलिंगला लटकून सदनात उडी मारली आणि गॅलरीतून झटपट सभागृहाच्या मध्यभागी धाव घेतली. यामुळे गोंधळ उडाला.
दुसरीकडे, लोकसभेच्या कामकाजादरम्यान दोन जणांनी सभागृहात उडी मारल्याची घटना घडल्यानंतर काही वेळातच दोन लोकांनी धुराच्या डब्यातून पिवळा आणि लाल धूर पसरवला आणि संसद भवनाच्या स्वागत दालनाबाहेरील प्रवेशद्वाराच्या चौकात घोषणाबाजी केली. नीलम आणि अमोल शिंदे अशी त्यांची नावे आहेत. या दोघांनाही दिल्ली पोलिसांनी तात्काळ अटक केली. नीलम हिसार ही हरियाणाची रहिवासी आहे तर अमोल शिंदे महाराष्ट्रातील लातूरचा रहिवासी आहे.
संसद भवनाबाहेर धुर सोडल्यानंतर दोघांनीही ‘हुकूमशाही चालणार नाही’, ‘भारत माता की जय’ आणि ‘जय भीम, जय भारत’ अशा घोषणा दिल्या. दिल्ली पोलिसांचा विशेष कक्ष या दोन्ही घटनांचा तपास करणार असल्याची माहिती या आधिकाऱ्यांनी दिली आहे. एकूण सहा जणांचा या कटात सहभाग असल्याचा दिल्ली पोलिसांना संशय आहे. यापैकी चौघांना अटक करण्यात आली आहे, तर दोघांचा शोध सुरू आहे.
हे ही वाचा:
पाकस्थित गुप्तचर एजंटच्या संपर्कात आलेल्या तरुणाला ठाण्यातून अटक
लोकल ट्रेनमध्ये तरुणीसोबत ठुमकने होमगार्डला पडले महागात!
पडघ्यात ‘काँग्रेसच्या मुहब्बत की दुकान’ची ब्रांच…
२० हजारात बेकायदेशीर बांग्लादेशीची घुसखोरी, एजंटसह सात बांग्लादेशीना अटक!
UAPA हा दहशतवादी कारवायांना रोखण्यासाठी आणला गेला. UAPA अंतर्गत, दहशतवादी आणि दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असल्याचा संशय असलेल्या लोकांवर कारवाई केली जाते.