मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यावर बीडच्या शिरूर आणि अमनेरमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मराठा आरक्षणासाठी परवानगी शिवाय रास्तारोको आंदोलन केल्याप्रकरणी पोलिसांकडून मनोज जरांगे यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. मनोज जरांगे यांच्या सूचनेनुसार विविध ठिकाणी रास्ता रोको केल्याप्रकरणी मराठवाड्यात १ हजार ४१ जणांवर तर बीड जिल्ह्यातल्या ४२५ जणांवर वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांत गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. मनोज जरांगे यांच्यावर शिरूर आणि अमनेरमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राज्य सरकार सगेसोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी करत नसल्याने मनोज जरांगे पाटील यांनी गावोगावी रास्ता रोको करण्याचे आवाहन मराठा बांधवांना केले होते. मनोज जरांगे यांच्या सूचनेनुसार राज्यभरातील विविध ठिकाणी मराठा समाज बांधवांच्या वतीने रास्ता रोको करण्यात आला. याच पार्श्वभूमीवर विना परवानगी रास्ता रोको करून वाहतुकीला अडथळा केल्याप्रकरणी जरांगे यांच्यासहित त्यांच्या सहकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
जरांगे यांच्यावर कलम ३४१,१४३,१४५,१४९,१८८ अन्वये गुन्हा दाखल झाला आहे. मनोज जरांगे यांनी बीडमध्ये सर्वसामान्यांना रास्ता रोको करण्यासाठी प्रोत्साहित केले. त्यामुळे, शहरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होऊन नागरिकांची गैरसोय झाली. बीडमध्ये इतर २५ ठिकाणी ट्रॅफिक जाम झाल्याने हा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, यांनी दिली.
हे ही वाचा:
शाहजहान शेखला ताबडतोब अटक करा!
मनोज जरांगेंची माघार; आमरण उपोषण घेतले मागे
शर्टावरील अरेबिक शब्द पाहून पाकिस्तानात महिलेवर जमावाचा हल्ला
‘सुशांतसारखे टोकाचे पाऊल उचलण्याच्या विचारात होतो’
मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी त्यांचे उपोषण स्थगित केले आहे. अंतरवाली सराटी येथे सुरु असलेले आमरण उपोषण मागे घेत असल्याची घोषणा मनोज जरांगे यांनी केली आहे. त्यांनी उपचारांची तयारी दाखविली असून मराठा समाजाला मात्र त्यांनी साखळी उपोषण करण्याचा सल्ला दिला आहे. मनोज जरांगे यांनी सोमवार, २६ फेब्रुवारी रोजी दुपारी अंतरवाली सराटी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत आमरण उपोषण स्थगित करत असल्याचे जाहीर केले. डॉक्टरांचा सल्ला घेऊन पुढे काय करायचे, हे ठरवेन. पुढील एक-दोन दिवस उपचार घेणार असून त्यानंतर पुढचा दौरा घोषित करणार अशी माहिती त्यांनी दिली.