शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीतील श्लोक घेण्यात येणार असल्याच्या निषेधार्थ शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी महाड येथे मनुस्मृतीचे दहन केले. मात्र, मनुस्मृती दहन करत असतानाच जितेंद्र आव्हाड यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो असलेलं पोस्टर फाडलं. यावरून जितेंद्र आव्हाड यांना लक्ष्य केलं जात असतानाच त्यांनी हा प्रकार अनावधानाने झाल्याचं म्हणत माफी मागितली. मात्र, यानंतरही आव्हाड यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली असून या प्रकरणी त्यांच्या विरोधात दोन गुन्हे दाखल झाले आहेत.
शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीतील श्लोक घेण्यास विरोध दर्शवण्यासाठी म्हणून जितेंद्र आव्हाड हे महाड येथील चवदार तळ्यावर गेले होते. यावेळी त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो असलेलं पोस्टर फाडलं. यावरून मोठा गदारोळ माजला होता. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं पोस्टर फाडल्याप्रकरणी जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात पुण्यात पहिला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यातील बंड गार्डन पोलीस ठाण्यामध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे शहर भाजपाकडून ही तक्रार करण्यात आली होती.
तसेच जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात रायगडमध्ये दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी महाड शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर रायगडमध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी जमावबंदीचे आदेश दिले होते. या आदेशाचं जितेंद्र आव्हाड यांनी उल्लंघन केल्यामुळे त्यांच्या आणि २२ कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हे ही वाचा:
स्टंटबाजीच्या नादात जितेंद्र आव्हाडांनी फाडला डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो!
मुख्यमंत्री शिंदेंविरोधातला ‘रोखठोक लेख’ राऊतांना भोवणार!
‘आप’ने झटकले हात, “काँग्रेससोबतची आमची युती कायमची नाही!”
ब्लड सॅम्पलची अफरातफर करणारे ससूनमधील तीन जण निलंबित
दरम्यान, जितेंद्र आव्हाड यांनी डॉ. बाबासाहेबांचा फोटो फाडल्याने भाजपा आक्रमक झाला असून गुरुवारी राज्यभर आंदोलन करण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखालील रिपाइं सुद्धा उद्या आव्हाड यांच्या विरोधात आंदोलन करणार आहे.