‘बिग बॉस’ फेम मुनव्वर फारुकीवर गुन्हा दाखल

हुक्का बारमध्ये मारलेल्या छाप्यादरम्यान पोलिसांची कारवाई

‘बिग बॉस’ फेम मुनव्वर फारुकीवर गुन्हा दाखल

‘बिग बॉस हिंदी १७’ या पर्वाचा विजेता आणि कॉमेडियन मुनव्वर फारुकी हा पुन्हा एकदा वादात सापडला आहे. मंगळवार, २६ मार्च रोजी रात्री मुंबईतील एका हुक्का बारमध्ये मारलेल्या छाप्यादरम्यान पोलिसांनी मुनव्वर फारुकीला ताब्यात घेतलं होतं. त्याच्यासह इतर १३ लोकांनाही मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. मात्र, त्यांची चौकशी करून त्यांना सोडून देण्यात आल्याचे मुंबई पोलिसांनी म्हटले आहे.

फोर्ट परिसरातल्या एका हुक्का पार्लरमध्ये पोलिसांनी छापेमारी केली. तिथून मुनव्वर फारुकीसह १४ जणांना ताब्यात घेण्यात आलं. मात्र, जामीनपत्र गुन्हा असल्याने पोलिसांनी आरोपींना नोटीस देऊन सोडलं आहे. या कारवाईत ४,४०० रुपये रोख आणि ९ हुक्का पॉट जप्त करण्यात आले आहेत. तसेच एकूण १७ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी एम आर ए मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या हुक्का बारच्या हुक्क्यांमध्ये बंदी असलेल्या तंबाखूचा वापर केला जात होता. पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर रात्री उशिरा त्यांनी बारवर छापा टाकला. त्यावेळी तिथे उपस्थित असलेले लोकं बंदी घातलेला तंबाखू असलेला हुक्का ओढत असल्याचं पोलिसांना समजलं. त्यामुळे पोलिसांनी बारमध्ये उपस्थित असलेल्या सर्वांना ताब्यात घेतलं. मुंबई पोलिसांच्या समाजसेवा शाखेने छापा टाकून हुक्का बारमधून १४ जणांना ताब्यात घेतले होते. पोलिसांनी सर्वांना चौकशीसाठी पोलीस ठाण्यात नेले. तेथे प्रश्नांची उत्तरे दिल्यानंतर पोलिसांनी सर्वांना सोडून दिले.

हे ही वाचा:

अमेरिकेत जहाज धडकून ब्रिज कोसळला

‘जय श्री राम’ बोलला म्हणून मीरा रोडमध्ये अल्पवयीन मुलाला केली मारहाण

पंजाबमध्ये अकाली नको; भाजपा ‘अकेला’ करणार वाटचाल

पुतिन म्हणतात, मॉस्को हल्ल्यामागे ‘कट्टरपंथी इस्लामवादी’

मुनव्वर नेहमी कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. यापूर्वी २०२१ मध्ये इंदूरमधील एका स्टँडअप कॉमेडी कार्यक्रमादरम्यान भगवान रामाबद्दल केलेल्या टिप्पणीमुळे त्याला अटक करण्यात आली होती. या प्रकरणात तो ३५ दिवस तुरुंगात होता. त्यानंतर मुनव्वरनं लॉकअप या शोमध्ये भाग घेतला होता. या कार्यक्रमाचा तो विजेता ठरला. त्यानंतर बिग बॉस १७ मध्ये सहभागी होऊन तो विजेता ठरला.

Exit mobile version