अमरावतीमध्ये सोमवार, ११ मार्च रोजी जबरदस्त राडा झाला. अमरावतीत विभागीय आयुक्तालयाबाहेर पांढरी खानमपूर येथील आंदोलक आणि पोलिसांमध्ये तुफान राडा झाला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रवेशद्वाराच्या मुद्द्यावरुन जमाव आक्रमक झाला आणि त्यांनी पोलिसांवर दगडफेक केली. तर जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला. या प्रकरणी आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
अमरावतीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वाराचा मुद्द्यावरून वाद उभा राहिला असून अंजनगाव सुर्जी तालुक्यातील पांढरी खानमपूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचे प्रवेशद्वार लावण्यावरून दोन गट आमनेसामने आले होते. या मुद्द्यासाठी आंदोलन सुरू होते. यावेळी आंदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक करण्यात आली. त्यानंतर आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केल्याची माहिती आहे. गेल्या पाच दिवसांपासून खानापूर गावच्या प्रवेशद्वाराचा वाद सुरू आहे. दरम्यान, पोलिसांनी संचारबंदीही लागू केली होती. मात्र, संचारबंदी झुगारून मोठ्या संख्येने आंदोलक अमरावतीत पोहोचले.
आंदोलकांनी केलेल्या दगडफेकीत २७ पोलीस कर्मचारी आणि अधिकारी जखमी झाले असून पाच महिला पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. काही जखमींवर खाजगी तर काही जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर २५ हून अधिक आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
हे ही वाचा..
अजित डोभाल आणि नेतान्याहू यांची भेट
देशात नागरिकत्व सुधारणा कायदा लागू
शासकीय कागदपत्रांवर आईचे नाव बंधनकारक
मविआ सरकार म्हणजे खोडा-काडी सरकार!
प्रकरण काय?
अमरावती जिल्ह्यातील पांढरी खानमपूर गावात महापुरुषांच्या नावाची कमान उभारण्यावरुन गावातील दोन गटांमध्ये वाद आहे. गावात कमान उभारण्यावरून दोन गट पडले आहेत. कमानीवरून वाद विकोपाला गेल्यानंतर हा मुद्दा प्रशासनाकडे गेला. दोन दिवसांपूर्वी या मुद्यावर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी बैठक घेतली होती. तसेच याप्रकरणी चौकशी करण्याचे आदेश त्यांनी दिले होते. चार दिवसांपूर्वी या गावातील एका गट अमरावतीच्या दिशेने निघाले होते. त्यानंतर हे सर्वजण अमरावतीहून मुंबईत मंत्रालयाकडे जाणार होते. त्यावेळी जिल्हा प्रशासनाने त्यांची समजूत काढून योग्य तोडगा काढण्याचे आश्वासन दिले होते. याबाबत चर्चा सुरू होती. मात्र गेल्या तीन दिवसांपासून काहीच निर्णय होत नसल्याने एक गट आक्रमक झाला आणि त्यांनी दगडफेक सुरू केली.