बेंगळुरूत वर्दळीच्या रस्त्यावरून बसस्टॉप चोरीला

बेंगळुरूत वर्दळीच्या रस्त्यावरून बसस्टॉप चोरीला

बंगळुरू शहर पोलिस आयुक्त कार्यालयाच्या मागे आणि विधानसभेपासून एक किमीपेक्षा कमी अंतरावर असलेल्या सदैव वर्दळीच्या असणाऱ्या कन्निघम रस्त्यावर असलेला स्टेनलेस स्टीलचा मजबूत असा १० लाख रुपयांचा शहरातील परिवहन सेवेचा बसस्टॉपच चोरीला गेला आहे. एक आठवड्यापूर्वीच हा नवा कोरा बसस्टॉप येथे उभारण्यात आला होता.

हा बसस्टॉप चोरीला गेल्यानंतर तब्बल एक महिन्यानंतर ३० सप्टेंबर रोजी चोरीची तक्रार दाखल करण्यात आली आहे. बेंगळुरू शहरात परिवहन सेवेद्वारे बीएमटीसी बस चालवल्या जातात. या बीएमटीसी बसगाड्यांसाठी बसस्टॉपचे काम एका कंपनीला देण्यात आले आहे. या कंपनीच्या तक्रारीवरून पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.

‘आम्ही बेंगळुरू शहरात बीबीएमपी बसगाड्यांसाठी बसस्टॉप उभारण्याचे काम हाती घेतले आहे. आम्ही २१ ऑगस्ट रोजी कन्निघम रस्त्यावर बसस्टॉप उभारला होता. यासाठी तब्बल १० लाख रुपये खर्च आला होता. मात्र २८ ऑगस्ट रोजी आम्ही जेव्हा तिथे गेलो, तेव्हा जागेवरून बसस्टॉपच गायब होता. आम्ही बीबीएमपी परिवहन सेवेकडे हा बसस्टॉप तुम्ही काढला का, अशी विचारणा केली होती. मात्र त्यांना याबाबत काहीच कल्पना नव्हती. अखेर आम्ही पोलिसांत तक्रार दाखल करण्याचा निर्णय घेतला,’ अशी माहिती कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

या बसस्टॉपवरून लिंगराजपूरम, हेन्नुर, बनसावाडी, पुलिकेशिनगर, गंगेनाहल्ली, भूपसंद्रा, हेब्बल आणि येलाहांका येथे बस सुटतात. त्यासाठी या बसस्टॉपवरून शेकडो प्रवासी जातात. एका प्रवाशाने सांगितले की, येथे काही महिन्यांपूर्वी खूप जुना बसस्टॉप होता. तो काही महिन्यांपूर्वीच जमीनदोस्त करण्यात आला होता. तो जमीनदोस्त केला नसता, तर मुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्याने तो नक्कीच पडला असता, असे एका प्रवाशाने सांगितले.

हे ही वाचा: 

ठाकरेंना ज्यांना गजाआड करायचे होते, त्या पोलिस संचालकपदी आल्या

विरोधकांच्या धमक्यांना मी घाबरत नाही!

‘वंदे भारत’चे स्लीपर कोच आलिशान

अभिनेता रणबीर कपूरला ईडीचे समन्स

तर, ‘नवीन बसस्टॉप ऑगस्टमध्ये उभारण्यात आला होता. मात्र काही दिवसांतच तो गायब झाला. तो का काढण्यात आला, आम्हाला काहीच कळले नाही. आता पाऊस पडला तर काय करायचे?,’ असा प्रश्न एका संतप्त महिलेने विचारला.
पोलिस तक्रार दाखल झाल्याने आता पोलिसही या बसस्टॉपचोरांच्या मागावर लागले आहेत. त्यासाठी ते आसपासच्या इमारतींवर लागलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमधील फुटेज मिळवण्याच्या प्रयत्नात आहेत. ते एकदा मिळाले की चोरांचा शोध घेऊन त्यांना जेरबंद केले जाईल, असा दावा पोलिसांनी केला आहे.

Exit mobile version