बिहार राज्यातील भागलपूर येथे बांधकाम सुरू असलेला पूल कोसळल्याची घटना रविवारी घडली. हे दृश्य कॅमेऱ्यात कैद झाले आहे. पुलाचे दोन भाग एकामागोमाग एक नदीत कोसळल्याचे या दृश्यात दिसत आहे. या अपघातात कोणत्याही जीवितहानीची नोंद झालेली नाही. तब्बल एक हजार ७१७ कोटी रुपये खर्च करून बिहारच्या खागरिया भागात हा पूल बांधला जात होता.
रविवारी सकाळी सहा वाजता ही घटना घडली. या अपघाताची चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी दिले असून अपघाताला जबाबदार असणाऱ्यांचा शोध घेण्याचे निर्देशही दिले आहेत. या संदर्भात ‘पूल निर्माण निगम’ प्राधिकरणाला अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. एप्रिल २०२२मध्ये झालेल्या वादळातही या पुलाचे नुकसान झाले होते. खागरिया, अगुवानी आणि सुलतानगंज यांना जोडणारा हा पूल गंगा नदीवर बांधला जात होता. या पुलाचा मधला भाग दोन वर्षांपूर्वीही कोसळला होता.
#WATCH | Under construction Aguwani-Sultanganj bridge in Bihar’s Bhagalpur collapses. The moment when bridge collapsed was caught on video by locals. This is the second time the bridge has collapsed. Further details awaited.
(Source: Video shot by locals) pic.twitter.com/a44D2RVQQO
— ANI (@ANI) June 4, 2023
भाजपची मुख्यमंत्र्यांवर टीका
पूल कोसळल्यानंतर भाजपने मुख्यमंत्र्यांवर तीव्र शब्दांत टीका केली आहे. ‘आता नितीश कुमार हे मुख्यमंत्रिपदाचा आणि तेजस्वी यादव उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देतील का?’, असा प्रश्न भाजप नेते अमित मालवीय यांनी विचारला आहे. ‘सन २०१५ मध्ये मुख्यमंत्र्यांनी पुलाचे भूमिपूजन केले होते. पुलाचे बांधकाम सन २०२० मध्ये पूर्ण होणार होते. हा पूल दुसऱ्यांदा कोसळला आहे. आता या घटनेची जबाबदारी स्वीकारून नितीशकुमार आणि तेजस्वी यादव त्वरित राजीनामा देतील का? राजीनामा करून दोघे काका-पुतण्या देशासमोर चांगले उदाहरण ठेवू शकतात,’ असे ट्वीट मालवीय यांनी केले आहे.
बिहारचे विरोधीपक्षनेते विजयकुमार सिन्हा यांनीदेखील नितीशकुमार यांच्या बिहार सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. ‘बिहारमध्ये कमिशन घेण्याची जणू परंपराच सुरू आहे. राज्यातील राजकीय अस्थिरतेचे हे परिणाम आहेत. त्यामुळे राज्यात बेबंदशाही आणि भ्रष्टाचार सुरू आहे. संपूर्ण यंत्रणाच कोलमडत असताना ते विरोधी पक्षांच्या एकजुटीची भाषा करत आहेत,’ अशी टीका त्यांनी केली आहे.
हे ही वाचा:
‘महाभारत’ मालिकेत शकुनी मामाची भूमिका साकारणारे गुफी पेंटल काळाच्या पडद्याआड
हेरॉईन घेऊन येणारं पाकिस्तानी ड्रोन सुरक्षा दलाच्या जवानांनी पाडलं
सुलोचना दीदींच्या पार्थिवावर शासकीय इतमात होणार अंत्यसंस्कार
अपघातानंतर बालासोर येथून ५१ तासानंतर पहिली रेल्वे निघाली, रेल्वेमंत्र्यांनी केली प्रार्थना!
याआधी डिसेंबर, २०२२ मध्येही बिहारच्या बेगुनसराई येथील बुर्ही नदीवरील पूल कोसळला होता. या पुलाला तडे गेल्याने पुलाचे दोन आणि तीन क्रमांकांचे खांब नदीवर कोसळले होते. तर, नोव्हेंबर, २०२२ मध्ये नितीशकुमार यांच्या नालंदा जिल्ह्यातील बांधकाम सुरू असलेला पूल कोसळून एक मजूर ठार तर एकजण जखमी झाल्याची घटना घडली होती.