मास्क लावा असे सांगितल्याने एका अल्पवयीन मुलाची हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अभिषेक फुलंब्रीकर असे त्या मुलाचे नाव असून तो फक्त सतरा वर्षांचा होता. चाकण (पुणे) येथील मेदनकरवाडी गावाचा अभिषेक रहिवासी होता. या प्रकरणात पोलिसांनी तिघांना अटक करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मंगळवारी, ६ एप्रिल रोजी अभिषेकला रस्त्यावर तीन जण बिना मास्कचे आढळून आले. सध्या महाराष्ट्रात आणि पुणे जिल्ह्यात कोरोनाचा वाढलेला प्रादुर्भाव लक्षात घेता जागरूक अभिषेकने या तिघांनाही मास्क घालण्याची विनंती केली. अभिषेकच्या या विनंतीचा त्या तिघांनाही प्रचंड राग आला. एक १७ वर्षांचा मुलगा आम्हाला अक्कल शिकवतो? या भावनेने ते प्रचंड संतापले. त्यांनी अभिषेकला धरले आणि गोसावीनगर येथील मोकळ्या मैदानात त्याला घेऊन आले. या मैदानात अभिषेकला त्यांनी शिवीगाळ आणि दमदाटी करायला सुरुवात केली. पुढे शाब्दिक दमदाटीचे रूपांतर मारहाणीत झाले. आधी लाथाबुक्क्यांनी, मग काठी आणि दगडांनी अभिषेकला बेदम मारहाण करण्यात आली. यावेळी अभिषेक मदतीसाठी टाहो फोडत होता. पण कोणीही त्याच्या मदतीला आले नाही.
हे ही वाचा:
पुणेकरांना मोदी सरकारची ‘थेट’ भेट
पवारांना घरपोच सेवेवरून कोर्टाने ‘लस’ टोचली
ठाकरे सरकारची परिस्थिती ‘नाचता येईना अंगण वाकडे’
या मारहाणीत अभिषेक गंभीर जखमी झाला . त्याला चाकण येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. तिथे त्याच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. पुढे त्याला पिंपरी-चिंचवड येथील यशवंतराव चव्हाण रुग्णालयात दाखल केले. पण बुधवार ७ एप्रिल रोजी अभिषेकवर उपचार सुरु असतानाच त्याचा मृत्यू झाला. अभिषेकच्या कुटुंबियांकडून या प्रकरणात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या तक्रारीच्या आधारे गणेश भैरू रेड्डी आणि इतर दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अभिषेकच्या मृत्यूनंतर या आरोपींवर हत्येची कलमे लावण्यात आली आहेत.