सांताक्रूझ पश्चिमेतील एका कपडे व्यापाऱ्याला व्हिडीओ कॉल करून एकाने मुंबईत बॉम्बने उडवण्याची धमकी दिली आहे. पोलिसांनी कॉल ट्रेस केला असून कॉल करणारी व्यक्ती हैद्राबाद येथे राहणारी असल्याचे समोर आले आहे. सांताक्रूझ पोलिसांचे एक पथक त्याचा शोध घेण्यासाठी हैद्राबादला रवाना झाले आहे.
सांताक्रूझ पश्चिमेतील एका कपडे व्यापाऱ्याला गुरुवारी एका अनोळखी क्रमांकावरून व्हाट्सअप्प वर मेसेज करण्यात आला होता. अनोळखी क्रमांक असल्यामुळे व्यापाऱ्याने त्या मेसेजकडे प्रथम दुर्लक्ष केले. काही वेळाने त्याच क्रमांकावरून व्हिडीओ कॉल आला. व्यापाऱ्याने तो कॉल उचलला असता समोरून तिशीतील एक व्यक्तीने व्यापाऱ्याकडे एमआयएम पार्टीचे ओवैसी यांचा मोबाईल क्रमांक व्यापाऱ्याकडे मागितला.
व्यापारी स्वतः एमआयएम पार्टीशी निगडित असल्यामुळे प्रथम त्यांनी ‘तुम कौन हो,मेरा नंबर किसने दिया’ अशी चौकशी केली. गुगल से निकाला असे बोलून समोरच्या व्यक्तीने मुंबई को बॉम्ब से उडा देंगे, अशी धमकी दिली आहे.
याप्रकरणी व्यापाऱ्याने सांताक्रूझ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून नंबर ट्रेस केला असता सदर नंबर हा हैद्राबाद येथील व्यक्तीचा असल्याची माहिती समोर आली आहे. या व्यक्तीचा शोध घेण्यासाठी सांताक्रूझ पोलिसांचे एक पथक हैद्राबाद येथे रवाना झाले आहे.