आईच्या कुशीतून पळवलेल्या तीन महिन्यांच्या चिमुरडीचा आझाद मैदान पोलिसांनी २४ तासात शोध घेऊन तिची एका दाम्पत्याच्या तावडीतून सुखरूप सुटका केली आहे. याप्रकरणी मुलीला चोरणाऱ्या मोहम्मद हनिफ आणि त्याच्या पत्नीला आझाद मैदान पोलिसांनी अटक केली आहे. चोरी केलेल्या मुलीची हे दोघे विक्री करणार होते अशी माहिती चौकशीतून समोर आली आहे.
मनीषा शेखर (वय ३०) ही पती आणि तीन मुलांसह मुंबईतील लोकमान्य टिळक मार्ग येथील सेंट झेविअर्स हायस्कुल समोरील फुटपाथवर झोपलेली असताना बुधवारी पहाटेच्या सुमारास तिच्या कुशीत झोपलेल्या तीन महिन्यांच्या मुलीला कोणीतरी चोरून नेल्याची तक्रार बुधवारी सकाळी आझाद मैदान पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात व्यक्ती विरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करून मुलीच्या शोधासाठी तात्काळ पथक गठीत केले होते. या पथकात इतर पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि अंमलदार यांना सामील करून मुलीचा शोध सुरु केला गेला.
पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तसेच रेल्वे स्थानकातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता एक संशयित इसम सीएसएमटी रेल्वे स्थानकातून हार्बर मार्गावरून एक लहान मुल सोबत घेऊन ट्रेन मध्ये चढताना आढळून आला. तपास पथकाने हार्बर मार्गावरील प्रत्येक रेल्वे स्थानकातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता सादर संशियत इसम गुरु तेग बहाद्दूर नगर रेल्वे स्थानकात उतरल्याचे दिसून आले.
त्यानंतर तपास पथकाने गुरु तेग बहाद्दूर नगर, अँटॉप हिल, प्रतीक्षा नगर, वडाळा परिसरात या इसमाचा शोध घेतला असता सदर इसम हा अँटॉप हिल येथील झोपड्यात वास्तव्यास असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तात्काळ या झोपडपट्टीत शोध घेऊन एका दाम्पत्याच्या तावडीतून चोरलेल्या मुलीची सुटका केली आणि या दाम्पत्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले.
हे ही वाचा:
एलॉन मस्क आता ‘ट्विट चीफ’, ताबा मिळताच सीईओंना कंपनीतून बाहेरचा रस्ता
जम्मू काश्मीरमध्ये लष्कराच्या वाहनाजवळ स्फोट तर कुलगाममध्ये एका दहशतवाद्याचा खात्मा
अवघ्या तीन रुपयांसाठी महिलेची केली हत्या
‘हिजाब’ प्रकरणात शैक्षणिक संस्थेचे नियम सर्वोच्च
मोहम्मद हनीफ इकबाल मेमन आणि अफ्रिन अशी या दोघांची नावे असून त्यांनीच या मुलीची चोरी केल्याची कबुली दिली. चोरलेल्या मुलीची विक्री करून पैसे कमविण्याचा हेतूने त्यांनी हे कृत्य केल्याची कबुली त्यांनी पोलिसांना दिली आहे. आझाद मैदान पोलिसांनी या दोघांना याप्रकरणी अटक केली असून त्यांच्या विरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. अटक करण्यात आलेल्या दाम्पत्याला दोन लहान मुले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.