डोंबिवली पोलिसांनी एका विनापरवाना बालगृहातून शुक्रवारी (२८ नोव्हेंबर) तब्बल ७१ मुलांची सुटका केली. कारवाई दरम्यान पोलिसांनी हे बालगृह चालवणाऱ्या एका डॉक्टरावर गुन्हा दाखल केला आहे. एका दाम्पत्याने आपल्या पाच दिवसाच्या नवजात बाळाला डोंबिवलीतील एका डॉक्टरला एक लाख रुपयांत बेकायदेशीरपणे विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. या प्रकरणी डोंबिवली रामनगर पोलीस ठाण्यात या दाम्पत्याविरुद्ध आणि डॉक्टर केतन सोनी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर डॉक्टर सोनी यांचे हे बालगृह प्रकरण उघडकीस आले आहे.
दाम्पत्याने १५ नोव्हेंबरला आपल्या पाच दिवसाच्या बाळाची विक्री केली. मात्र, ते बाळ परत मागण्यासाठी म्हणून त्या बाळाची आई दोन दिवसांनी डॉक्टर सोनी यांच्याकडे पोहोचली. मात्र डॉक्टरने बाळ देण्यास नकार दिला. त्यानंतर हा संपूर्ण धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी बाल संरक्षण विभाग आणि महिला बालविकास विभागाला याची माहिती मिळताच त्यांनी डॉक्टर सोनीच्या विरोधात गुन्हा दाखल केला.
हे ही वाचा:
‘बाबासाहेब पुरंदरे हे इतिहासाचे एनसायक्लोपिडीयाच होते’
नागपूरमधून ८४ लाखांची रोकड जप्त
जॅकलिनचा ‘तो’ रोमँटिक फोटो ठरणार का ED साठी पुरावा?
गायीच्या शेणापासून अँटी बॅक्टेरियटल कापडाची निर्मिती
तपासादरम्यान डॉ. केतन सोनी हा नंददीप या नावाने कल्याणमध्ये बेकायदेशीर बालगृह चालवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे या बालगृहात धाड टाकली असता ७१ बालकांची सुटका करण्यात आली आहे. तसेच या संस्थेपासून काही अंतरावर जुन्या इमारतीत २ ते १३ वर्षे वयोगटातील तब्बल ३८ मुलांना एका खोलीत कोंडून ठेवल्याचे धक्कादायक प्रकरण समोर आले. या मुलांच्या आरोग्याची काळजी घेण्यात आली नव्हती, सर्व मुले आजारी असल्याची माहिती जिल्हा बाल संरक्षण अधिकारी पल्लवी जाधव यांनी दिली. आता तब्बल ७१ मुलांची सुटका करून त्यांना शासकीय बाल सुधारगृहात ठेवण्यात आले आहे.
सखोल चौकशी केली असता ताब्यात घेतलेल्या ७१ मुलांची कोणतीच माहिती, कागदपत्र किंवा त्याची नोंद केलेली नाही. त्यामुळे ही मुले कशी आणली गेली याचा तपास पोलीस सध्या करत आहेत.