‘आप’ला २०१४ ते २०२२ या काळात ७.०८ कोटींचा परदेशी निधी

ईडीनं केंद्रीय गृहमंत्रालयाला पाठवला अहवाल

‘आप’ला २०१४ ते २०२२ या काळात ७.०८ कोटींचा परदेशी निधी

दिल्लीच्या दारू घोटाळ्यात अडकलेल्या आम आदमी पक्षाच्या अडचणी वाढतच चालल्या आहेत. या प्रकरणात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे जामीनावर बाहेर असून त्यांना २ जून रोजी आत्मसमर्पण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अशातच न्यायालयात सुरू असलेल्या या प्रकरणी आता ईडीने आम आदमी पार्टीला परदेशातून फंडिग होत असल्याचा खुलासा केला आहे. ‘आप’ला २०१४ ते २०२२ या काळात ७.०८ कोटी परदेशी निधी मिळाला. मात्र हा फंड देणाऱ्या परदेशी देणगीदारांची नावे आणि अन्य माहिती लपवण्याचा आरोप ईडीने केला आहे. ईडीनं याबाबत केंद्रीय गृहमंत्रालयाला अहवाल पाठवला आहे.

ईडीच्या म्हणण्यानुसार, आपला अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, सौदी अरेबिया, युएई, कुवेत आणि ओमान या देशांमधील अनेक देणगीदारांकडून निधी प्राप्त झाला आहे. फंड ट्रान्सफर करण्यासाठी विविध देणगीदारांकडून एकच पासपोर्ट, क्रेडिट कार्ड, ईमेल आयडी आणि मोबाईल नंबरचा वापर करण्यात आला आहे, असा आरोप करण्यात आला आहे. परदेशी देणगीदारांची ओळख आणि राष्ट्रीयत्व तसेच परदेशी देणग्यांशी संबंधित इतर अनेक तथ्ये लपवून, चुकीची घोषणा करून आणि फेरफार करून ही रक्कम उभी केली गेली, असा आरोप तपास संस्थेने केला आहे. ईडीने आप आणि त्यांच्या नेत्यांना मिळालेल्या परदेशी फंडातील अनियमिततेवर बोट ठेवले आहे.

ईडीने आपल्या तपासात, आप आणि त्यांच्या नेत्यांनी परदेशी निधी गोळा करण्याच्या अनेक घटनांचा दावा केला आहे आणि कॅनडातील निधी उभारणीच्या कार्यक्रमादरम्यान गोळा केलेला निधी पळवून नेल्याचा आरोप आप आमदार दुर्गेश पाठक यांच्यासह काहींवर केला आहे. अनिकेत सक्सेना (आप ओव्हरसीज इंडियाचे समन्वयक), कुमार विश्वास (तत्कालीन आप ओव्हरसीज इंडियाचे संयोजक), कपिल भारद्वाज (तत्कालीन आप सदस्य) आणि दुर्गेश यांच्यासह विविध आप स्वयंसेवक आणि कार्यकत्र्यांमध्ये देवाणघेवाण केलेल्या ई-मेलच्या सामग्रीद्वारे आरोपांचे पुष्टीकरण केले आहे.

हे ही वाचा:

‘इंडी आघाडीच्या मतदारांमध्ये संभ्रम असल्यामुळे मतटक्का घसरला!’

भारत इराणच्या पाठीशी, राष्ट्राध्यक्षांच्या निधनानंतर पंतप्रधान मोदींकडून शोक व्यक्त!

‘बाळासाहेबांचा वारसा सांगता आणि काँग्रेसला अभिमानाने मतदान करता?’

बारावीच्या निकालाची प्रतीक्षा संपणार; तारीख ठरली

ईडीच्या म्हणण्यानुसार, परदेशात राहणाऱ्या १५५ लोकांनी ५५ पासपोर्ट क्रमांक वापरून ४०४ वेळा एकूण १.०२ कोटी रुपयांची देणगी दिली. तब्बल ७१ देणगीदारांनी २५६ प्रसंगी एकूण ९९.९० लाख रुपयांच्या देणग्या देण्यासाठी २१ मोबाईल क्रमांकांचा वापर केला आणि परदेशात राहणाऱ्या ७५ देणगीदारांनी १४८ वेळा एकूण १९.९२ लाख रुपयांच्या देणग्या देण्यासाठी १५ क्रेडिट कार्डचा वापर केला. ई-मेल आयडी आणि १९ कॅनेडियन नागरिकांचे मोबाईल नंबर वापरून कॅनेडियन नागरिकांच्या देणग्या एकूण ५१.१५ लाख रुपयांच्या ईमेल आयडी आणि मोबाइल नंबरद्वारे देणग्या प्राप्त झाल्या, असे ईडीने म्हटले आहे.

Exit mobile version