मुंबई वाहतूक पोलिसांनी गेल्या १३ महिन्यांत (१ जानेवारी २०२४ ते ५ फेब्रुवारी २०२५) वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ६५,१२,८४६ वाहन चालकांविरोधात कारवाई केली आहे. या कारवाईत ५२६ कोटी रुपयांचा दंड आकारण्यात आला असून, त्यापैकी केवळ १५७ कोटी रुपयांची वसुली झाली आहे, तर ३६९ कोटी रुपयांची थकबाकी राहिली आहे. ही माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी माहिती अधिकाराअंतर्गत मागवलेल्या प्रश्नाच्या उत्तरातून स्पष्ट झाली आहे.
वाहतूक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २६ प्रकारच्या वाहतूक नियमभंग प्रकरणांमध्ये ४१ वाहतूक आणि १ मल्टिमीडिया विभागाद्वारे कारवाई करण्यात आली. मात्र, केवळ २० लाख ९९,३९६ वाहन चालकांनी दंड भरला असून ४४ लाख १३,४५० वाहन चालकांनी अद्याप दंड अदा केलेला नाही.
हे ही वाचा:
“गव्हाच्या शेतात आढळणारे ‘पित्तपापडा’ गवत – एक आयुर्वेदिक वरदान”
कामराला समर्थन देणाऱ्या विरोधी बाकावरच्यांनी सुपारी दिली आहे का?
भारताने उत्पादन-आधारित मॉडेलकडे वळावे
मुरादाबादमध्ये बनावट आधार केंद्राचा पर्दाफाश, सपा कार्यकर्ता वाजिद मलिकला अटक!
फ्लिकर आणि अंबर दिव्यांवर कारवाई
वाहतूक नियमांचे उल्लंघन करत फ्लिकर आणि अंबर दिवे वापरणाऱ्या ४७ वाहन चालकांविरोधात कारवाई करत २३५०० रुपये दंड ठोठावण्यात आला. मात्र, यातील केवळ ७ वाहन चालकांनी ३५०० रुपये दंड अदा केला. सर्वाधिक कारवाई मरीन ड्राईव्ह परिसरात झाली असून, ३२ वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे.
आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी सांगितले की, “वाहतूक पोलिसांनी समाधानकारक कारवाई केली असली तरीही अधिकाऱ्यांची व कर्मचारी वर्गाची कमतरता असल्याने मोठ्या प्रमाणावर दंड वसुली होत नाही. दंड न भरलेल्या वाहनचालकांवर कठोर कारवाई करण्यासाठी विशेष वसुली मोहीम राबविण्याची गरज आहे.” दंड वसुलीसाठी वाहनचालकांना डिजिटल नोटिसा पाठवाव्यात. मोठ्या थकबाकीदार वाहनधारकांची वाहने जप्त करण्याची प्रक्रिया राबवावी, असे मत गलगली यांनी व्यक्त केले आहे.