ठाणे जिल्ह्यातील एका ४० मजली इमारतीची लिफ्ट कोसळल्यामुळे सहा कामगारांना आपले प्राण गमवावे लागले. एक कामगार गंभीररित्या जखमी असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
सर्व्हिस लिफ्टमध्ये बिघाड झाला आणि ती खाली कोसळल्यामुळे हे सहा कामगार मृत्यूमुखी पडले. बाळकूम भागातील रुणवाल आयरिन इमारतीत ही घटना घडली. ज्या सहा कामगारांचा मृत्यु झाला त्यांची नावे महेंद्र चौपाल (३२), रुपेशकुमार दास (२१), हरून शेख (४७), मिथिलेश (३५), कालिदास (३८) अशी असून एकाची ओळख मात्र पटलेली नाही.
हे ही वाचा:
कोपर्डी हत्याप्रकरणातील आरोपी जितेंद्र शिंदेची येरवडा कारागृहात आत्महत्या !
जळगावच्या भाषणात उद्धव ठाकरेंची जळजळ
‘चिंतामणी’च्या मिरवणुकीत चोरट्यांचा जल्लोष
राजस्थानमध्ये बलात्कारित महिला तासनतास होती रस्त्यावर !
जिथे ही घटना घडली तिथे नेमके काय घडले याची तपासणी अग्निशमन दल आणि आपत्ती विभागाचे लोक करत होते. ठाणे महानगरपालिकेच्या आपत्ती विभागाचे प्रमुख यासिन तडवी यांनी सांगितले की, नियमित वापरली जाणारी लिफ्ट नव्हे तर सर्व्हिस लिफ्ट खाली कोसळली आहे. ४०व्या मजल्यावरून ही लिफ्ट खाली कोसळली. संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास ही घटना घडली. वरच्या मजल्यावर वॉटरप्रूफिंगचे काम करत असलेले कामगार या लिफ्टने खाली येत होत. त्यादरम्यान बिघाड झाला आणि दोरी तुटली. त्यामुळे ही लिफ्ट प्रचंड वेगाने खाली आली. ती पार्किंगच्या भागात कोसळली आणि त्यात हे कामगार मृत्युमुखी पडले.
सुनीलकुमार दास याला प्रचंड मार बसला असून त्याची प्रकृती गंभीर आहे. त्याला जवळच्या सरकारी रुग्णालयात नेण्यात आले आहे.