दहशतवादी विरोधी पथकाकडून बोरिवली पूर्व येथील एका लॉज मधून ६ संशयितांना शस्त्रासाठ्यासह अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेले ६ संशयित हे उत्तर प्रदेश आणि नवी दिल्ली येथे राहणारे असून त्यांच्यावर खून दरोडा सारखे गंभीर गुन्हे असल्याची माहिती एटीएसने दिली आहे.
शहादत हुसेन उर्फ कल्लू रेहमत हुसेन,असलम शब्बीरअली खान,नदीम युनूस अन्सारी, रिझवान अब्दुल लतीफ,नौशाद अन्वर,आदिल खान असे अटक करण्यात आलेल्या ६ संशयितांची नावे आहेत. या संशयितांकडून एक गावठी कट्टा, एक देशी बनावटीची पिस्टल, एक विदेशी बनावटीची पिस्टल, ४ मॅगझिन, २९ राउंडसह चाकु तसेच स्कॉर्पिओ वाहन व दरोडा टाकण्यासाठी आवश्यक असलेले साहित्य जप्त करण्यात आलेले आहेत.राज्य दहशतवादी विरोधी पथकाच्या मुंबई जुहू युनिट ने कस्तुरबा मार्ग पोलिसांच्या मदतीने ही कारवाई केली आहे.
हे ही वाचा:
उत्तर प्रदेशातील २५० वर्षे जुन्या मशिदीमध्ये ‘अजान’ देणार्या व्यक्तीला अटक!
तृणमूल काँग्रेस नेते सत्यन चौधरी यांची भरदिवसा हत्या!
सीतामाईच्या माहेराहून ‘जावई’ श्रीरामासाठी आले रुखवत
बोरिवली पूर्व येथील एलोरा लॉज या ठिकाणी परराज्यातील काही इसम संशयास्पदरित्या राहत आहे, व त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात शस्त्र असून त्यांच्या हालचाली संशयास्पद असल्याची माहिती एटीएस च्या जुहू युनिटला मिळाली होती.या माहितीच्या आधारे एटीएस च्या पथकांने शनिवारी कस्तुरबा मार्ग पोलिसांच्या मदतीने एलोरा लॉज या ठिकाणी छापा टाकला असता त्या ठिकाणी एका खोलीत हे संशयित आढळून आले.एटीएस आणि कस्तुरबा मार्ग पोलिसानी या सहाही संशयितांना ताब्यात घेऊन त्यांच्या खोलीतून एक गावठी कट्टा, एक देशी बनावटीची पिस्टल, एक विदेशी बनावटीची पिस्टल, ४ मॅगझिन, २९ राउंडसह चाकु तसेच स्कॉर्पिओ वाहन व दरोडा टाकण्यासाठी आवश्यक असलेले साहित्य जप्त करण्यात आलेले आहेत.
या प्रकरणी ६ ही जणांविरोधात कस्तुरबा मार्ग पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल करून आरोपिकडे चोकशी केली असता शहादत हुसेन उर्फ कल्लू रेहमत हुसेन,असलम शब्बीरअली खान या दोघावर गाझियाबाद येथे हत्येचा गुन्हा दाखल आहेत.रिझवान अब्दुल लतीफ,नौशाद अन्वर यांच्याविरुद्ध दरोडा चोरी इत्यादी गंभीर गुन्ह्याची नोंद आहे.
आदिल खान हा स्कॉर्पिओ वाहन चालक असून तो टोळीत सहभागी होता अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
या टोळीच्या संशयास्पद हालचाली वरून तसेच त्याच्या चौकशीत ही टोळी मुंबईत मोठ्या दरोड्याच्या तयारीत होती अशी माहिती समोर आली.