जमिनीच्या वादातून एकमेकांवर गोळीबार, ६ ठार!

उत्तर प्रदेशातील देवरियामधील घटना

जमिनीच्या वादातून एकमेकांवर गोळीबार, ६ ठार!

उत्तर प्रदेशातील देवरिया येथील माजी जिल्हा पंचायत सदस्य प्रेम यादव आणि सत्य प्रकाश दुबे यांच्यात दीर्घकाळापासून जमिनीचा वाद सुरु आहे.जमिनीचा वाद विकोपाला गेला आणि दोन्ही गटांकडून गोळीबार करण्यात आला.या गोळीबारात सहा जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत.या चकमकीनंतर जिल्ह्यात अनेक वाहनांचे नुकसान झाले असून जाळपोळीच्या घटना घडल्या आहेत. देवरिया जिल्ह्यातील रुद्रपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील फतेहपूर गावात ही घटना घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा वाद सकाळी ७:०० च्या सुमारास सुरू झाला आणि तो एवढा वाढला की दोन्ही गटांनी एकमेकांवर धारदार वस्तूंनी हल्ला केला आणि गोळीबार केला, परिणामी सहा जणांचा मृत्यू झाला.सत्यप्रकाश दुबे आणि त्यांच्या कुटुंबीयांनी मिळून त्यांचा प्रतिस्पर्धी माजी जिल्हा पंचायत सदस्य प्रेम यादव (५०) यांची त्याच्या घरी धारदार शस्त्रांनी हल्ला करून त्यांची हत्या केली, असे विशेष डीजी, कायदा व सुव्यवस्था, प्रशांत कुमार यांनी सांगितले.

त्याचा बदला म्हणून अभयपूर येथील यादव समर्थकांनी दुबे यांच्या घरावर हल्ला केला आणि दुबे आणि त्यांच्या कुटुंबातील पाच जणांची हत्या केली, असे त्यांनी सांगितले. 54 वर्षीय दुबे यांच्याशिवाय त्यांची पत्नी किरण दुबे (५२), मुली सलोनी (१८), नंदनी (१०) आणि मुलगा गांधी (१५) यांचा या हल्ल्यात मृत्यू झाला. या हल्ल्यात दुबे यांचा मुलगा अनमोल जखमी झाला असून त्याला उपचारासाठी मेडिकल कॉलेजमध्ये पाठवण्यात आले आहे.या हत्येप्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली आहे, असे कुमार म्हणाले.

हे ही वाचा:

एलॉन मस्क यांनी ट्रुडो यांच्याविरोधात थोपटले दंड!

ते जर्मनीच्या अध्यक्षांचे निवासस्थान, बोर्डिंग स्कूल नव्हे!

अविनाश साबळेची सोनेरी धाव!

तजिंदरपालसिंगने केली सुवर्णविजेती गोळाफेक!

याप्रकरणी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या दुर्घटनेवर तीव्र दु:ख व्यक्त करत, पोलीस आयुक्त आणि महानिरीक्षकांना दोषींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. मुख्यमंत्र्यांनी जखमींना तातडीने रुग्णालयात नेण्याचे निर्देश दिले असून त्यांच्यावर योग्य उपचार करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

देवरिया सदरचे भाजप आमदार शलभ मणी त्रिपाठी यांनी सांगितले की, त्यांना या हत्येचे दुःख झाले असून ते या प्रकरणाची चौकशी करणार आहेत.”देवरियाच्या रुद्रपूर विधानसभा मतदारसंघातील फतेहपूर येथे घडलेल्या क्रूर घटनेने ह्रदय दुखावले आहे. ही अत्यंत दुर्दैवी आणि दुःखद घटना आहे. हा प्रकार पूर्णपणे निंदनीय आहे ,” असे त्रिपाठी म्हणाले.”याची सखोल चौकशी केली जाईल आणि कठोर कारवाईच्या सूचना देण्यात आल्या आहेत. महसूल आणि पोलिस प्रशासनाच्या जबाबदारीवर दोषींना सोडले जाणार नाही,” असेही ते म्हणाले.

Exit mobile version