ठाण्याचे रहिवासी असणाऱ्या चौघांना स्वस्त दरात गंगासागर दर्शन करवण्याचे आमिष दाखवून बंधक बनवून ठेवल्याची घटना पश्चिम बंगालमध्ये घडली. मात्र सुंदरबन पोलिसांनी मोठ्या धाडसाने या चारही लोकांची अपहरणकर्त्यांच्या तावडीतून सुटका केली आहे. याशिवाय सहा अपहरणकर्त्यांना देखील अटक केली आहे.
पोलिसांनी धाडसाने केलेल्या या कामगिरीत जमाल गाझी, सैफुद्दीन पुरोकयात, कुतुबुद्दीन पुरोकयात, इम्रान मीर, हबीबुल्ला गाजी आणि रज्जाक लस्कर या चार अपहरणकर्त्यांना अटक केली आहे. या भामट्यांनी ठाण्याचे रहिवासी असणाऱ्या सैकत सुरेश पानसरे, सागर सुरेश पानसरे, अरूण शिवम, विनिता अरुण बराते यांना ओलिस ठेवून त्यांच्याकडून वीस लाख रूपयांची खंडणी मागितली. आनंदबाझार पत्रिकेच्या संकेतस्थळावर याबाबत विस्तृत वृत्त प्रसिद्ध झाले आहे.
या सहा अपहरणकर्त्यांपैकी जमाल गाझी हा यापूर्वी मुंबईत राहिला होता. त्याचा आणि या चार जणांचा परिचय होता. हे चारही लोक जमालच्याच सांगण्यावरून पश्चिम बंगाल येथे गेले होते. जमालने त्यांना स्वस्त दरात गंगासागर तीर्थस्थानाचे दर्शन घडवून आणण्याचे आमिष दिले होते. या आमिषाला पानसरे आणि बराते बळी पडले. त्या चौघांना गंगासागरला येण्याचे आमिष दाखवून जमाल बंगाल येथे निघून गेला. तिथे त्याने आपल्या साथीदारांसमवेत या चौघांच्या अपहरणाची योजना तयार केली.
बुधवार दिनांक १३ जानेवारी २०२१ रोजी, चौघेही पर्यटक बंगाल येथे पोहोचले. बंगालमधील हावडा स्थानकावर त्यांची आणि जमालची भेट झाल्यानंतर, जमाल त्या सर्वांना घेऊन मथुरापूर होकलडांगा येथे घेऊन गेला. तेथे या चौघांना बंदी करण्यात आले आणि त्यांच्याकडचे फोन, इतर मौल्यवान सामान आणि ₹४५,००० हिसकवून घेण्यात आले. त्यांच्यापैकी एकाला आपल्या नातेवाईकांना फोन करून खंडणीची रक्कम सांगण्यास भाग पाडले.
नातेवाईकांनी मात्र चतुराई दाखवत, स्थानिक पोलिसांना या घटनेची खबर दिली. त्यानंतर पोलिसांनी ज्या क्रमांकावरून फोन केला त्या फोनचे ठिकाण ट्रॅक केले, आणि या ही सर्व माहिती सुंदरबन पोलिसांना दिली. सुंदरबन पोलिसांनी या माहितीच्या आधारे योग्य स्थानी छापा मारून या सर्व पर्यटकांची सुटका केली आणि सर्व अपहरणकर्त्यांना ताब्यात घेतले.
यानंतर पोलिसांनी पर्यटकांच्या भावनेचा आदर राखत त्यांच्या गंगासागराच्या दर्शनाची आणि नंतर सुखरूप ठाण्याला परतण्याची सोय देखील केली.
Dhanyavad pashchim bangal policeanche.
Je aata tyanchi pratima sudharat aahet.