कर्नाटकमधील मंड्या जिल्ह्यात बुधवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास गणेश विसर्जन मिरवणुकीत दोन गटांत हाणामारी झाली. यानंतर दगडफेक, तोडफोड आणि जाळपोळीच्या घटनाही घडल्या. या घटनेमुळे मंड्या जिल्ह्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. परिस्थिती नियंत्रणात असल्याचं सांगण्यात येत असून पोलिसांनी कलम १४४ लागू केलं आहे. दरम्यान, या प्रकरणी कर्नाटक पोलिसांनी ५२ जणांना अटक केली आहे.
जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेबाबत बोलताना कर्नाटकचे गृहमंत्री जी परमेश्वर म्हणाले की, “परिस्थिती नियंत्रणात आणि शांततापूर्ण आहे. पोलिसांनी त्यावर नियंत्रण मिळवले आहे. ५२ जणांना ताब्यात घेतले आहे.”
कर्नाटकमधील मंड्या जिल्ह्यातील नागमंगला येथे बुधवार, ११ सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजताच्या सुमारास गणेश विसर्जनाची मिरवणूक सुरु होती. यावेळी मिरवणूक नागमंगलाच्या म्हैसूर रोडवरील दर्ग्याजवळून जात असताना दोन गटांमध्ये बाचाबाची झाली. पुढे वाद वाढला आणि जाळपोळ, तोडफोडीच्या घटना घडल्या. काही समाजकंटकांनी दुकानांची तोडफोड करून वाहनेही पेटवली. यानंतर संपूर्ण परिसरात खळबळ उडाली. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. सध्या या परिसरात पोलिसांनी मोठ्या प्रमाणात फौजफाटा तैनात केला आहे.
हे ही वाचा :
कर्नाटकच्या मंड्यामध्ये दर्ग्याजवळून जात असलेल्या गणपती मिरवणुकीवर दगडफेक
फरार उद्योगपती नीरव मोदीची २९ कोटींची मालमत्ता जप्त !
राहुल गांधींच्या शीखांवरील वक्तव्याविरोधात दिल्लीत आंदोलन !
बेकायदेशीर असेल तर मशिदी, मदरसेही पाडले पाहिजेत!
मंड्याचे उपायुक्त डॉ. कुमार यांनी सांगितले की, “गणेशाच्या मिरवणुकीदरम्यान संध्याकाळी ही घटना घडली. मिरवणूक मशिदीजवळ पोहोचली तेव्हा काही लोकांनी दगडफेक केली. याला विरोधही झाला. आयजी, एसपी आणि मी घटनास्थळी भेट दिली असून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आवश्यक पावले उचलण्यात आली आहेत. १४ सप्टेंबर पर्यंत कलम १४४ लागू असणार आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.”