चक्क घराचे भाडे भरण्यासाठी केले शेजारच्या ५ वर्षाच्या मुलाचे अपहरण

चक्क घराचे भाडे भरण्यासाठी केले शेजारच्या ५ वर्षाच्या मुलाचे अपहरण

घराचे भाडे भरण्यासाठी एकाच इमारतीत राहणाऱ्या ५ वर्षाच्या मुलाचे अपहरण करणाऱ्या महिलेला पोलिसांनी अटक केली आहे. अपहरण करण्यात आलेला पाच वर्षांचा मुलगा पोलिसांना पालघर जिल्ह्यातील बोईसर पोलीस ठाण्यात सुखरूप मिळून आला आहे. पूर्व उपनगरातील मानखुर्द येथील लल्लूभाई कंपाउंड या ठिकाणी हा प्रकार घडला आहे.

मानखुर्दच्या लल्लूभाई कंपाउंड या ठिकाणी एका इमारतीत राहणारा ५ वर्षाचा मुलगा बुधवारी बेपत्ता झाला होता. या प्रकरणी मानखुर्द पोलीस ठाण्यात तक्रार दाखल होताच पोलिसानी अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता ५ वर्षाच्या मुलाला एक १० वर्षाची मुलगी हाताला पकडून घेऊन जात असल्याचे दिसून आले.

पोलिसांनी या फुटेजचा माग घेतला असता गोवंडी परिसरात एक महिला या दोघाना घेऊन जाताना दिसून आली.
या महिलेची माहिती पोलिसांनी काढली असता ही महिला अपहरण करण्यात आलेल्या मुलाच्या इमारतीत राहणारी असल्याचे समोर आले. या महिलेचा शोध घेण्यात आला असता या महिलेच्या मोबाईलचे शेवटचे लोकेशन कल्याण दिसून आले.

पोलिसांनी कल्याण येथे धाव घेऊन सदर महिलेस ताब्यात घेउन अपहरण करण्यात आलेल्या मुलाबाबत चौकशी केली असता तिने पोलीस मागावर असल्याच्या भीतीने मुलाला बोईसर येथे सोडल्याची कबुली दिली. पोलिसांनी बोईसर पोलिसाना संपर्क साधून चौकशी केली असता एक मुलगा आम्हाला मिळून आलेला असून तो सुखरूप असल्याची माहिती बोईसर पोलिसानी दिली.

हे ही वाचा:

धारावी गोळीबार प्रकरणी अटक करण्यात आलेले सात जण होते ‘के’ कंपनीचे

‘गुरुनानक देवजींची तपोभूमी लाहोर भारतात नाही, हे काँग्रेसने केलेले पाप’

पेटीएम, नायका, पीबी आणि झोमॅटो गुंतवणूकदार बुडाले

लवकरच येणार हवेत उडणाऱ्या बस…

 

मानखुर्द पोलिसांचर एक पथक बोईसर येथे रवाना झाले व त्यांनी मुलाला ताब्यात घेऊन मानखुर्द येथे रवाना झाली.
ताब्यात घेण्यात आलेल्या महिलेकडे चौकशी केली असता ती गेल्या काही महिन्यांपासून आर्थिक विवंचनेत असून घराचे भाडे देण्यासाठी तिच्याकडे पैसे नव्हते. घरमालक सतत भाड्यासाठी तगादा लावत होता, नाहीतर घर खाली करा म्हणून धमकी देत असल्यामुळे मुलाचे अपहरण करून त्याची विक्री करण्याचा कट रचला होता अशी माहिती महिलेने पोलिसांना दिली. याप्रकरणी पोलिसांनी या महिलेला अटक केली आहे.

Exit mobile version