डोंबिवलीत लहान मुलांच्या गेम झोनमध्ये पाचवर्षीय मुलाचा मृत्यू!

प्रतिनिधी, कल्याण

डोंबिवलीत लहान मुलांच्या गेम झोनमध्ये पाचवर्षीय मुलाचा मृत्यू!

मुलांच्या गेम झोनमधील प्लास्टिकच्या जाळीत मान अडकून पाच वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी संध्याकाळी डोंबिवली पूर्वेला घडली. अनंतम रिजन्सीमधील रहिवाशांनी या प्रकरणी विस्तृत तपासाची मागणी केली आहे.

या मुलाचे नाव सक्षम उंडे असे असून तो सीनिअर केजीमध्ये शिकत होता. या बाबत काही निष्काळजी झाली का, याचाही तपास केला जात आहे. मानपाडा पोलिसांनी या प्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. सक्षम हा त्यांच्या आईवडिलांचे एकुलते एक अपत्य होता. त्याचे वडील भारत एका खासगी कंपनीत काम करतात तर, आई गृहिणी आहे.
मंगळवारी सक्षम आणि त्याची आई लहान मुलांसाठी राखीव ठेवलेल्या गेम झोनमध्ये गेले होते. ही जागा केवळ तीन ते सहा वयोगटातील मुलांसाठी राखीव आहे.

या गेम झोनमध्ये आत जाण्यास आई-वडिलांना परवानगी नसल्याने या मुलाची आई बाहेरच वाट पाहात थांबली होती. तर, गेम झोनवर लक्ष ठेवण्यासाठी नियुक्त केलेले दोन निरीक्षक तेथे होते. मात्र अचानक खेळता खेळता सक्षमची मान प्लास्टिकच्या जाळ्यात अडकली आणि तो काही क्षणांतच बेशुद्ध पडला. तिथे असलेल्या केअरटेकरने त्याला तातडीने बाहेर आणले आणि जवळच्या एम्समध्ये दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

हे ही वाचा:

२० लाख अफगाणी नागरिकांना पाकिस्तान परत पाठवणार

कोंडी सोडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोलिसालाच जमावाने घेरून केली मारहाण

हमासचे ३०० तळ आणि भुयारांचे जाळे उद्ध्वस्त; हमासचा कमांडर ठार

ड्रग्स माफिया अली असगर शिराझी संबंधिताभोवती ईडीचा फास

या प्रकरणाच्या चौकशीची मागणी रहिवाशांनी केली आहे. ‘आम्हाला या निष्काळजीची विस्तृत पोलिस चौकशी हवी आहे. या गेम झोनमध्ये अनेक मुले खेळायला जातात,’ असे लता आरगाडे यांनी सांगितले. रिजन्सी अनंतमच्या विकासकाकडूनच क्लब हाऊस, स्विमिंग पूल आणि मुलांचा गेम झोनचे व्यवस्थापन बघितले जाते.
याआधी मे २०१६मध्ये एक आठ वर्षांची मुलगी प्रशिक्षकाची नजर चुकवून मोठ्या स्विमिंग पूलमध्ये गेल्याने तिचा बुडून मृत्यू झाल्याची घटना कल्याणमधील रोझाली हाऊसिंग कॉम्प्लेक्समध्ये घडली होती. तर, मे २०१८मध्ये डोंबिवलीतील पलावा टाऊनशिपमधील कासा बेल्ला अपार्टमेंटच्या क्लब हाऊसमधील स्विमिंग पूलमध्ये सहा वर्षांच्या मुलीचा बुडून मृत्यू झाला होता.

Exit mobile version