जम्मू-काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यात गुरुवारी दहशतवाद्यांनी लष्कराच्या दोन वाहनांवर हल्ला केल्याने पाच जवान हुतात्मा झाले आणि दोन जखमी झाले आहेत.ढेरा की गली आणि बुफलियाज भागातील धत्यार मोर येथून जवानांना घेऊन जाणाऱ्या लष्कराच्या वाहनांवर दहशतवाद्यांनी गुरुवार दुपारी ३:४५ च्या सुमारास हल्ला केला.
मिळालेल्या माहितीनुसार, पूंछ जिल्ह्यातील धत्यार मोर हे ठिकाण दहशतवाद्यांनी हल्ला करण्यासाठी निवडले होते.कारण, या भागात धोकादायक वळणे आहेत तसेच भागातील रस्ते अत्यंत खडबडीत-खराब आहेत.यामुळे येथून जाणाऱ्या वाहनांची गती कमी करावी लागते.या ठिकाणावरून जात असताना लष्करी वाहनांचा वेग मंदावला होता.जवानांवर हल्ला करण्यासाठी दहशतवाद्यांनी ढेरा की गली आणि बुफलियाज भागातील धत्यार मोर येथे एका टेकडीवर दहशतवादी तळ ठोकून बसले होते.धत्यार मोर भागातून लष्करी वाहने जात असताना लष्कराच्या दोन वाहनांवर दहशतवाद्यांनी गोळ्या झाडल्या.
हे ही वाचा:
समुद्रीचाच्यांना रोखण्यासाठी अदनच्या खाडीत आयएनएस कोच्ची, कोलकाता तैनात
‘फुटीरतावाद्यांविरोधात कॅनडा कारवाई करेल, ही आशा’
चांद्रयान- ३ च्या ऐतिहासिक कामगिरीसाठी आइसलँडकडून ‘इस्रो’चा सन्मान
भावाला किडनी दिली म्हणून दिला तिहेरी तलाक!
लष्करी प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी या भागात दहशतवाद्यांच्या उपस्थितीबद्दल माहिती मिळाली.त्यानुसार एक संयुक्त ऑपरेशन सुरू करण्यात आले.लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी शोध पक्षावर गोळीबार केला, प्रत्युत्तरासाठी जवानांकडूनही गोळीबार झाला, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.अतिरिक्त फौजा घटनास्थळी हलवण्यात येत असताना गुरुवारी दुपारी ३:४५ च्या सुमारास दहशतवाद्यांनी लष्कराच्या एक ट्रक आणि एक मारुती जिप्सी या वाहनांवर हल्ला केला.या हल्ल्यात पाच जवान हुतात्मा झाले.सुरक्षा दलांकडून प्रत्युत्तर देण्यात आले मात्र, दहशतवादी त्या ठिकाणाहून पळून जाण्यात यशस्वी झाले.जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
इंडिया टुडेच्या बातमीनुसार, पाकिस्तानस्थित असेलली दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबा (एलईटी) च्या शाखेचा गट पीपल्स अँटी फॅसिस्ट फ्रंट (PAFF) या दहशतवादी गटाने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.