अंमलबजावणी संचालनालयाने म्हणजेच ईडीने उत्तर प्रदेशातील सहारनपूरमध्ये बहुजन समाज पार्टीचे (बसपा) माजी आमदार मोहम्मद इक्बाल यांच्यावर मोठी कारवाई केली आहे. अवैध खाणकाम प्रकरणी ईडीकडून ही मोठी कारवाई करण्यात आली आहे. ईडीने माजी आमदार मोहम्मद इक्बाल यांच्या ग्लोकल युनिव्हर्सिटीची १२१ एकर जमीन आणि इमारत जप्त केली आहे. मोहम्मद इक्बाल यांच्या जप्त केलेल्या मालमत्तेची किंमत जवळपास ४ हजार ४४० कोटी रुपये आहे. इक्बाल सध्या फरार असून दुबईत असल्याची माहिती आहे, असे ईडीने सांगितले. त्याच्याविरोधात लूक आऊट परिपत्रक जारी करण्यात आले आहे.
सहारनपूरमध्ये अवैध खाणकाम प्रकरणी ईडीने मोठी कारवाई केली आहे. ईडीच्या लखनौस्थित झोन कार्यालयाच्या पथकाने इक्बाल ग्लोकल युनिव्हर्सिटीची १२१ एकर जमीन आणि सर्व इमारती जप्त केल्या आहेत. जप्त केलेल्या मालमत्तेची किंमत ४,४४० कोटी रुपये आहे. सीबीआय आणि इतर एजन्सीही इक्बालविरुद्ध तपास करत आहेत. ईडी इक्बाल विरुद्ध बसपा शासनाच्या काळात झालेल्या बहुचर्चित साखर मिल घोटाळ्याची देखील चौकशी करत आहे आणि या प्रकरणात २०२१ मध्ये त्याची १०९७ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली होती.
दरम्यान, ईडीने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मोहम्मद इक्बाल यांनी २०१० ते २०१२ यादरम्यान सहारनपूर आणि आसपासच्या बेकायदेशीर खाणकामातून ५०० कोटींहून अधिक रुपये जमा केले होते. यानंतर त्यांनी ही रक्कम ग्लोकल युनिव्हर्सिटीमध्ये गुंतवली. मोहम्मद इक्बाल यांनी ही जमीन अब्दुल वाहिद एज्युकेशनल अँड चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून खरेदी करून त्यावर युनिव्हर्सिटी उभारली होती. सध्या मोहम्मद इक्बाल हे फरार असून दुबईला असण्याची शक्यता आहे. त्यांची चार मुले आणि भाऊ वेगवेगळ्या गुन्ह्यात तुरुंगात आहेत. ईडीच्या म्हणण्यानुसार, मोहम्मद इक्बाल हे अब्दुल वाहिद एज्युकेशनल अँड चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष होते. तसेच, ट्रस्टचे सर्व विश्वस्त मोहम्मद इक्बाल यांच्या कुटुंबातील होते.
ED, Lucknow has provisionally attached 121-acre Land and building of Glocal University Saharanpur worth Rs. 4,440 Crore belonging to Abdul Waheed Educational and Charitable Trust in illegal mining case under the provisions of PMLA, 2002.
— ED (@dir_ed) June 14, 2024
हे ही वाचा..
अमोल किर्तीकारांची मागणी फेटाळत मतमोजणीच्या ठिकाणाचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार
पाकिस्तानच्या राष्ट्रीय अर्थसंकल्प २०२४-२५ मध्ये अल्पसंख्याकांसाठी शून्य तरतूद
लेखिका अरुंधती रॉय यांच्यावर दहशतवादविरोधी कायद्यांतर्गत खटला चालवण्यास मंजुरी
सामन्यानंतर अमेरिकेचा क्रिकेटपटू हॉटेलमधून करतो वर्क फ्रॉम होम
सीबीआयने १० वर्षांपूर्वी या प्रकरणाचा तपास सुरू केला होता. यानंतर ईडीने मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. अवैध खाणकाम प्रकरणी लीजधारक महमूद अली, दिलशाद, मूहम्मद इनाम, महबूब आलम (मृत), नसीम अहमद, अमित जैन, नरेंद्र कुमार जैन, विकास अग्रवाल, मोहम्मद इक्बाल यांचा मुलगा मुहम्मद वाजिद, मुकेश जैन, पुनित जैन यांच्यावर आरोप आहेत. ईडीच्या तपासात असे समोर आले आहे की सर्व खाण कंपन्या मुहम्मद इक्बालच्या मालकीच्या आणि चालवल्या जात होत्या. इक्बाल आणि त्याच्या निकटवर्तीयांच्या कंपन्यांनी सहारनपूर आणि परिसरात मोठ्या प्रमाणावर अवैध खाणकाम केले होते. त्या कंपन्यांच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचे व्यवहार झाले.