भारतीय क्रिकेट संघातील वेगवान गोलंदाज उमेश यादवचा त्याच्याच मित्राने ४४ लाखांचा गंडा घालून विश्वासघात केला आहे.भारतीय क्रिकेट संघातील वेगवान गोलंदाज उमेश यादवला त्याच्याच मॅनेजरने गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एकेकाळचा जीवलग मित्र आणि मॅनेजर शैलेश ठाकरे याने उमेश यादवच्या बँक खात्यातून सुमारे ४४ लाख रुपये लंपास केले आहेत. आरोपीनं या रकमेतून स्वत:च्या नावे संपत्ती खरेदी केली असून हा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर उमेश यादवने पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी शैलेश ठाकरे विरोधात विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील घटनेचा तपास करत आहे.
काय आहे प्रकरण ?
उमेश यादव याची भारतीय क्रिकेट संघात निवड झाल्यानंतर अनेकदा त्याला स्पर्धेच्या निमित्ताने देशात आ णि परदेशात जावं लागत होतं. या काळात उमेश यादवने आपला मित्र आणि आरोपी शैलेश ठाकरे याला आर्थिक आणि पत्र व्यवहार सांभाळण्याची जबाबदारी दिली होती. त्याने शैलेश ठाकरे याला पगारी मॅनेजर म्हणून नियुक्त केले होते.
हे ही वाचा:
भारतीय अर्थव्यवस्था होणार इतक्या डॉलरची
महाराष्ट्र मच्छिमार संघाच्या संचालकपदी रामदास संध्ये यांची निवड
गूढ उकलले; बेपत्ता असलेल्या सदिच्छा सानेचा खून झाला!
मॅनेजर म्हणून काम करत असताना आरोपी शैलेशने त्याची कोणतीही कामं केली नाहीत, असा आरोप उमेश यादवने केला. दरम्यान, एक संपत्ती खरेदी करण्यासाठी उमेश यादवने आपल्या बँक खात्यात एकूण ४४ लाख रुपये ठेवले होते. पण या पैशातून उमेश यादवसाठी संपत्ती खरेदी करण्याऐवजी शैलेश ठाकरेंन स्वत:साठीच संपत्ती खरेदी केली. शिवाय उमेश यादवला हे पैसेही परत दिले नाहीत. शैलेश ठाकरेंने लाखो रुपयांची फसवणूक केल्याचं लक्षात आल्यानंतर उमेश यादवने पोलीस ठाण्यात धाव घेतली.
उमेश यादवने कोराडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला असून आरोपी शैलेश ठाकरेचा पोलीस शोध घेत आहेत. या गुन्ह्याचा सविस्तर तपास कोराडी पोलीस करत आहेत.