बेकायदा मानवी तस्करी रोखण्यासाठी राष्ट्रीय तपास संस्था आणि सीमा सुरक्षा दलाने संयुक्तपणे मोहीम राबवली आहे. या अंतर्गत देशभरात टाकण्यात आलेल्या छाप्यांत ४४ जणांना अटक करण्यात आली आहे. तर, मानवी तस्करी प्रकरणातील पाच टोळ्या उद्ध्वस्त करण्यात आल्या आहेत.
ही मोहीम राष्ट्रीय तपास संस्था, सीमा सुरक्षा दल आणि राज्याच्या पोलिसांनी संयुक्तपणे राबवली. भारत-बांगलादेश सीमेवरून भारतात बेकायदा घुसखोरी करून बांगलादेशी नागरिकांना देशात स्थलांतरित करण्यास मदत करणारी टोळी उद्ध्वस्त करण्यासाठी ही मोहीम राबवण्यात आली.मानवी तस्करीच्या चार प्रकरणांची नोंद राष्ट्रीय तपास संस्थेच्या गुवाहाटी, चेन्नई, बंगळुरू, जयपूर आणि अन्य ठिकाणी झाली होती.
त्यानुसार, काही राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील तब्बल ५५ ठिकाणी छापे मारण्यात आले. त्रिपुरा, आसाम, पश्चिम बंगाल, कर्नाटक, तमिळनाडू, तेलंगणा, हरियाणा, राजस्थान आणि जम्मू व काश्मीर, पुडुचेरी येथेही शोधमोहीम राबवण्यात आल्याची माहिती एनआयएच्या प्रवक्त्यांनी दिली.आसाम पोलिसांच्या स्पेशल टास्क फोर्सने ९ सप्टेंबर रोजी गुन्ह्याची नोंद केली होती. भारत-बांगलादेश सीमेवरून बेकायदा घुसखोरी करून त्यांना, विशेषतः रोहिंग्या मुसलमानांना भारतात स्थलांतरित होण्यास मदत करणाऱ्या मानवी तस्करी टोळ्या असल्याचे या तक्रारीत नमूद करण्यात आले होते. ही मोहीम देशातील अनेक भागांत राबवण्यात आली. या तस्करीमागे आंतरराष्ट्रीय आणि राज्यांतर्गत जाळे असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता.
हे ही वाचा:
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ११ निर्णयांना मान्यता!
संगमनेर कारागृहातून चार कैद्यांचे पलायन!
एल्विश यादव प्रकरणाच्या वैदकीय अहवालात धक्कादायक माहिती समोर!
भारत-बांगलादेश सीमेवर घुसखोरांच्या मागे लागणार मधमाशा!
राष्ट्रीय तपास संस्था अर्थात एनआयएने ६ ऑक्टोबर रोजी या तपासाची सूत्रे स्वतःकडे घेतली. त्यात धक्कादायक बाबी उघड झाल्या. या मानवी तस्करीचे धागेदोरे तमिळनाडू, कर्नाटक, राजस्थान, हरियाणा आणि जम्मू-काश्मीरपर्यंत पसरले असल्याचे आढळून आले आहे. या तपासाच्या आधारावर एनआयएने राज्यांराज्यांत हातपाय पसरलेल्या मानवी तस्करी करणाऱ्या टोळ्या उद्ध्वस्त करण्यासाठी काही नव्या गुन्ह्यांची नोंद केली आहे. एनआयएने गुरुवारी, ८ नोव्हेंबर रोजी पहाटेपासूनच राज्यांतील विविध ठिकाणी छापे मारले. या छाप्यात मोबाइल, सिम कार्ड आणि पेन ड्राइव्ह यांसारखी सामग्री जप्त करण्यात आली आहे.
त्यांच्याकडून आधार कार्ड, पॅन कार्ड ही ओळखपत्रेही जप्त करण्यात आली आहेत. ही सर्व कार्डे बनावट असल्याचा संशय आहे. शिवाय, त्यांच्याकडून २० लाख रुपयांच्या भारतीय चलनाच्या नोटा तसेच, चार हजार ५५० अमेरिकी डॉलर जप्त करण्यात आले आहेत.राष्ट्रीय तपास संस्थेने ४४ जणांना अटक केली असून त्यातील त्रिपुरामधून २१, कर्नाटकमधून १०, आसाममधून पाच, पश्चिम बंगालमधून तीन, तमिळनाडूमधून दोन तर तेलंगणा, पुदुचेरी आणि हरियाणामधून प्रत्येकी एकाला अटक करण्यात आली आहे. या सर्वांना संबंधित राज्यांच्या न्यायालयापुढे सादर केले जाणार आहे.