पश्चिम बंगालच्या मालदा जिल्ह्यातील मोथाबारी परिसरात दोन समुदायांमध्ये हिंसाचार होऊन तणावाची स्थिती निर्माण झाली. या घटनेत अनेक दुकाने आणि घरांची तोडफोड करण्यात आली. जाळपोळीच्या घटनाही घडल्या. या हिंसाचारानंतर तब्बल ३४ जणांना अटक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
पश्चिम बंगालच्या मालदा जिल्ह्यातील मोथाबारी भागात दोन समुदायांमध्ये संघर्ष सुरू झाल्याने तणाव वाढला. ३४ जणांना अटक करण्यात आली. हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर, परिसरातील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली असून परिसरात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तर, कोलकाता उच्च न्यायालयाने शुक्रवारी जिल्हा दंडाधिकारी आणि पोलिस अधीक्षकांना ३ एप्रिलपर्यंत हिंसाचाराचा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच या प्रकरणाची संवेदनशीलता अधोरेखित करताना, न्यायालयाने म्हटले आहे की राज्य सरकारने दक्षतेने काम करावे आणि हिंसाचारामुळे प्रभावित झालेल्यांच्या सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी आवश्यक पावले उचलावीत.
पोलिसांनी सांगितले की, “बुधवारी एक रॅली निघाली होती, ही रॅली स्थानिक परिसरात असेल्या एका मशिदीजवळून गेली. यावेळी काही लोकांनी मशिदीजवळ फटाके फोडल्याचा आरोप करण्यात आला. काही लोकांनी आंदोलने केली. यावेळी अचानक पोलिसांवर दगडफेक करत वाहनाची तोडफोड करण्यात आली. यानंतर जमावाला नियंत्रित करण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज करत अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. यावेळी जमावाने परिसरातील वाहने आणि दुकानांची तोडफोड केली.”
मालदा जिल्हा पोलिसांनी माहिती देताना सांगितलं की, “आतापर्यंत तक्रारींच्या आधारे सहा गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच आतापर्यंत या प्रकरणात ३४ जणांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांचे पेट्रोलिंग मोबाईल युनिट्स सक्रिय आहेत. सर्व नागरिकांना शांतता राखण्याचं आवाहन करत आहोत.”
हे ही वाचा :
भूकंपग्रस्त म्यानमारसाठी भारताकडून वैद्यकीय गोष्टींसह १५ टन मदत साहित्य रवाना
“पंतप्रधान मोदी अत्यंत हुशार व्यक्ती आणि माझे चांगले मित्र”, ट्रम्प असे का म्हणाले?
“आरोग्यासाठी वरदान आहे त्रिफळा, पचनशक्तीपासून रोगप्रतिकारक शक्तीपर्यंत लाभदायक”
उलेमा बोर्डाच्या १७ मागण्या मान्य करताना तुम्हाला हिंदुत्व आठवलं नाही का?
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष सुकांता मजुमदार यांनी म्हटले की, “पक्षाच्या एका शिष्टमंडळाला शुक्रवारी मोथाबारी परिसरात प्रवेश करण्यास परवानगी देण्यात आली नाही. मोथाबारी येथे परिस्थिती तणावपूर्ण आहे. हिंदू मंदिरे आणि घरांची तोडफोड करण्यात आली आहे. राज्यपाल सीव्ही आनंद बोस यांच्याशी बोलणे झाले असून गृहमंत्री अमित शाह यांच्या कार्यालयाशीही संपर्क साधला आहे. आता परिस्थिती नियंत्रणात असली तरी पश्चिम बंगालमध्ये अशा घटना वारंवार का घडत आहेत हा प्रश्न आहे,” असं सुकांता मुजुमदार यांनी म्हटलं आहे.