नक्षलवादाविरुद्धचा लढा अधिक आक्रमकपणे सुरू असून छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यात शुक्रवार, १८ एप्रिल रोजी सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले आहे. तब्बल ३३ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. यात महिलांचाही समावेश आहे. विशेष म्हणजे यातील १७ जणांच्या डोक्यावर लाखोंचे बक्षीस होते.
पोलिसांनी सांगितले की, ११ महिलांसह ३३ नक्षलवाद्यांनी त्यांच्यासमोर आत्मसमर्पण केले आहे. त्यापैकी जवळजवळ अर्ध्या जणांवर, म्हणजे १७ जणांच्या डोक्यावर ४९ लाख रुपयांचे बक्षीस होते. पोलिसांनी अधिकची माहिती देताना सांगितले की, नऊ महिलांसह २२ नक्षलवाद्यांनी वरिष्ठ पोलिस आणि केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) अधिकाऱ्यांसमोर आत्मसमर्पण केले, तर नंतर दोन महिलांसह ११ नक्षलवाद्यांनीही पोलिस अधिकाऱ्यांसमोर आत्मसमर्पण केले. आत्मसमर्पण केलेले नक्षलवादी सुरक्षा दलांवरील अनेक हल्ल्यांमध्येही सहभागी होते.
सुकमाचे पोलिस अधीक्षक किरण चव्हाण म्हणाले की, आत्मसमर्पण करणाऱ्या माओवाद्यांमध्ये माड विभागातील पीएलजीए (पीपल्स लिबरेशन गुरिल्ला आर्मी) कंपनी क्रमांक १ चा डेप्युटी कमांडर मुचाकी जोगा (वय ३३ वर्षे) आणि त्याच पथकातील सदस्य आणि त्याची पत्नी मुचाकी जोगी (वय २८ वर्षे) यांचा समावेश आहे. या दोघांच्या नावावर प्रत्येकी ८ लाख रुपयांचे बक्षीस होते. इतर नक्षलवाद्यांमध्ये किकिद देवे (वय ३० वर्षे) आणि मनोज उर्फ दुधी बुधरा (वय २८ वर्षे) यांचा समावेश आहे, जे माओवादी क्षेत्र समितीचे सदस्य आहेत आणि त्यांच्या डोक्यावर प्रत्येकी ५ लाख रुपयांचे बक्षीस होते.
पोलिसांनी माहिती दिली आहे की, आत्मसमर्पण केलेले नक्षलवादी माड (छत्तीसगड) आणि नुआपाडा (ओडिशा) या माओवाद्यांच्या विभागात सक्रिय होते. तर आत्मसमर्पण करणारे इतर ११ नक्षलवादी फुलबागडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील बडेसट्टी ग्रामपंचायतीत सक्रिय होते. त्यांनी सांगितले की, यासह बडेसट्टी नक्षलमुक्त ग्रामपंचायत झाली आहे. जिल्हा पोलिस, जिल्हा राखीव रक्षक (डीआरजी), सीआरपीएफ आणि त्यांच्या विशेष युनिट कोब्राने माओवाद्यांना आत्मसमर्पण करण्यास भाग पाडण्यात महत्त्वाची भूमिका बजावली, असे अधिकाऱ्याने सांगितले. ते म्हणाले की, शस्त्रे समर्पण करणाऱ्या सर्व नक्षलवाद्यांना सरकारकडून मिळणाऱ्या सर्व सुविधा पुरवल्या जातील.
हे ही वाचा :
रशियाने युक्रेनमधील भारतीय औषध कंपनीच्या गोदामावर क्षेपणास्त्र टाकले?, दूतावासाने दिले उत्तर!
पंतप्रधान मोदींचा एलोन मस्क यांना फोन; कोणत्या विषयांवर केली चर्चा?
‘मी बाजीगर आहे, हार मानत नाही!’
काही दिवसांपूर्वीचं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी नक्षलवाद्यांना शस्त्रे खाली ठेवून मुख्य प्रवाहात सामील होण्याचे आवाहन केले होते. मार्च २०२६ पर्यंत छत्तीसगडच्या बस्तर प्रदेशातील लाल दहशतवाद संपवण्यासाठी सरकार वचनबद्ध आहे, असे प्रतिपादनही अमित शाह यांनी केले होते.