अंडरवर्ल्डशी संबंधित ३२८ कोटींच्या ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश

विविध राज्यांतून १५ आरोपींच्या आवळल्या मुसक्या

अंडरवर्ल्डशी संबंधित ३२८ कोटींच्या ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश

मीरा-भाईंदर पोलिसांच्या गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत अंडरवर्ल्डशी संबंधित ३२८ कोटी रुपयांच्या ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी विविध राज्यातील १५ आरोपींना अटक करण्यात आली आहे. शिवाय कारवाई दरम्यान पोलिसांनी ३२८ कोटी रुपयांचे मेफेड्रोन म्हणजेच एमडी ड्रग्ज जप्त केले आहे. त्यासोबतच तीन पिस्तुल, एक रिव्हॉलवर ३३ जिवंत काडतुसेदेखील पोलिसांनी जप्त केली आहेत.

लोकसभा निवडणुकीच्या काळात मिरा- भाईंदर गुन्हे शाखेच्या एका पथकाने नाकाबंदी वेळी १५ मे रोजी काशीमिरा भागातून शोएब मेमन आणि निकोलेस यांना ताब्यात घेतले होते. हे दोघे एमडी ड्रग्जची विक्री करण्यासाठी आले होते. यावेळी दोन कोटी रुपयांचे एमडी ड्रग्स जप्त करण्यात आले होते. या दोघांनी दिलेल्या माहितीनुसार हे ड्रग्स तेलंगणामधून आणले असे समजताच पोलिसांचे एक पथक तेलंगणा येथे रवाना झाले होते. तेलांगणामधील विकाराबाद जिल्ह्यातून नासिर उर्फ बाबा शेख, दयानंद उर्फ दया माणिक यांना ताब्यात घेत २५ कोटी रुपयांचे एमडी ड्रग्स आणि कारखाना सील करण्यात आला आहे. यानंतर या प्रकरणात मोठी टोळी कार्यकरत असल्याचं निष्पन्न झालं.

पोलिसांनी तपास केल्यानंतर याचे धागेदोरे दाऊदचा जवळचा साथीदार सलीम डोलाशी जोडले गेले. जो विक्रीतून मिळालेल्या पैशाची देवाणघेवाण करायचा. सलीम हा ड्रग्जचे जाळे भारतभर पसरवण्याचे काम दुबईतून करत असल्याचे उघड झाले. या प्रकरणात आणखी काही नावे समोर आली आहेत. आरोपी सलीम डोला आणि दयाचा सहकारी अमीर तौफिक खान, त्याचा भाऊ बाबू तौफिक खानचा सहकारी मोहम्मद नदीम शफीक खान, अहमद शाह फैसल शफीक आझमी ही नावे समोर आली. त्यांच्याकडून ३०० कोटी रुपयांच्या एमडी कच्च्या मालाचे १२ ड्रम जप्त करण्यात आले.

हे ही वाचा:

विश्वचषक जिंकल्यानंतर बीसीसीआयकडून पंतप्रधान मोदींना खास भेट

ड्रग्ज माफिया ललित पाटील पलायन प्रकरणी दोन पोलीस कर्मचारी बडतर्फ

भारतीय विश्वविजेत्या शिलेदारांची पंतप्रधान मोदींनी घेतली भेट

हाथरस चेंगराचेंगरी प्रकरणी २० जणांना अटक

या प्रकरणात महाराष्ट्रातून तीन, तेलंगणातून तीन, गुजरातमधून एक आणि उत्तर प्रदेशातून आठ आरोपींना अटक करण्यात आली आहे. यासह तीन पिस्तुले, एक रिव्हॉल्व्हर आणि ३३ काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. या गुन्ह्याचा तपास आता सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत गांगुर्डे करत आहेत.

Exit mobile version