श्रद्धा वालकर हत्येप्रकरणी ३००० पानी आरोपपत्र दाखल होणार

विविध साक्षीपुरावे, क्लिप्स, फॉरेन्सिक पुरावे यांचा उल्लेख

श्रद्धा वालकर हत्येप्रकरणी ३००० पानी आरोपपत्र दाखल होणार

श्रद्धा वालकर निर्घृण हत्याकांडप्रकरणी दिल्ली पोलिस ३ हजार पानी आरोपपत्र दाखल करू शकतील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. मे २०२२मध्ये ही हत्या झाली होती. त्यात आफताब या युवकाने तिची गळा दाबून हत्या केली आणि मग ३५ तुकडे करून ते इतस्ततः फेकत पुरावे नष्ट करायचा प्रयत्न केला होता. त्यावरून संपूर्ण देशात खळबळ उडाली होती. आफताबला त्यानंतर ताब्यात घेण्यात आले. त्याविरोधात आता हे आरोपपत्र दाखल होणार आहे.

त्यात १०० साक्षीदारांच्या साक्षी नोंदविण्यात आल्याचे कळते. तसेच त्यात न्यायवैद्यक पुराव्यांचाही समावेश आहे. पोलिसांनी आफताबची नार्को चाचणी केली आहे, त्याचा जाब नोंदविला आहे, ही माहिती आरोपपत्रात असेल शिवाय, जेव्हा पोलिसांनी आफताबच्या सांगण्यावरून जो शोध घेतला त्यात सापडलेली हाडे ही डीएनए चाचणीनंतर श्रद्धाचीच असल्याचे स्पष्ट झाले.

हे ही वाचा:

चीनमध्ये ८० टक्के लोकांना कोरोनाची बाधा

पीएफआयला भारतात प्रस्थापित करायचे होते इस्लामचे राज्य

औरंगजेबाबद्दल विधान करणाऱ्या अबू आझमी यांना जीवे मारण्याची धमकी

सेक्युलर फ्रंट समर्थकांची तृणमूल काँग्रेस आणि पोलिसांशी झटापट

डिसेंबर २०२२मध्ये पोलिसांना एक ऑडिओ क्लिप मिळाली होती. आफताब आणि श्रद्धा यांच्यातील संवादाची ती क्लिप होती. पोलिसांच्या म्हणण्यानुसार त्यातील आवाजावरून या दोघांमध्ये भांडण होत असल्याचे पोलिसांना कळले. त्यासाठी पोलिसांनी आफताबच्या आवाजाचा नमुनाही गोळा केला असून तो त्या ऑडिओ क्लिपमधील आवाजाशी जुळतो आहे. गेल्या वर्षी श्रद्धाच्या वडिलांनी आपल्या मुलीच्या बेपत्ता होण्याची तक्रार नोंदविली होती. तेव्हा तिचा मित्र आफताब पूनावाला यानेच तिची हत्या केल्याचे उघड झाले.

तसेच आफताब हा विकृत असल्याचेही स्पष्ट झाले. त्याने भाड्याने घेतलेल्या फ्लॅटमध्ये श्रद्धाची गळा दाबून हत्या केली आणि नंतर करवतीच्या सहाय्याने शरीराचे ३५ तुकडे केले. ते नंतर त्याने फ्रिजमध्ये साठवून ठेवले. त्यासाठी त्याने नवे फ्रिजही विकत घेतले. ३०० लिटरच्या या फ्रिजमध्ये हे तुकडे ठेवून तो याच खोलीत राहात होता. हे तुकडे हळूहळू त्याने रात्री उशिरा बाहेर पडून टाकून दिले. त्याचा सीसीटीव्हीतील ती क्लिपही उपलब्ध झालेली आहे. तिने वडिलांच्या विरोधात जाऊन आफताबशी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता त्यामुळे तिचा वडिलांशी कोणताही संपर्क नव्हता. आपल्यासाठी सगळे मेले आहेत अशी भावना तिने व्यक्त केली होती. त्यामुळे तिच्याशी कोणत्याही प्रकारचा संवाद वडिलांचा नव्हता. काही महिने आफताब आणि श्रद्धा एकत्र राहिले. पण त्यांच्यात भांडणे होऊ लागली. तिने लग्नाची मागणी केल्यानंतर त्याने संतापून तिचा खून केला.

Exit mobile version