गुजरातजवळील अरबी समुद्रातून १,८०० कोटींचे ३०० किलो ड्रग्ज जप्त

गुजरात एटीएस आणि तटरक्षक दलाची संयुक्त कारवाई

गुजरातजवळील अरबी समुद्रातून १,८०० कोटींचे ३०० किलो ड्रग्ज जप्त

गुजरात दहशतवाद विरोधी पथक (एटीएस) आणि तटरक्षक दलाला मोठे यश मिळाले असून अरबी समुद्रात कोट्यवधी रुपयांचे अमलीपदार्थ जप्त करण्यात आले आहे. अरबी समुद्रात एटीएस आणि तटरक्षक दलाच्या संयुक्त मोहिमेत तब्बल १,८०० कोटी रुपयांचे ३०० किलो ड्रग्ज जप्त करण्यात आले आहेत. हे ड्रग्ज तस्करांनी आंतरराष्ट्रीय सीमा (आयएमबीएल) ओलांडून पळून जाण्यापूर्वी अरबी समुद्रात टाकले होते, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

मोठ्या कारवाई दरम्यान जप्त केलेले अमलीपदार्थ मेथाम्फेटामाइन असल्याचा संशय असून पुढील चौकशीसाठी ते एटीएसकडे सोपवण्यात आले आहे, असे भारतीय तटरक्षक दलाने प्रसिद्ध केलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. एटीएस आणि तटरक्षक दलाने १२ आणि १३ एप्रिलच्या मध्यरात्री गुजरातजवळील अरबी समुद्रातील आंतरराष्ट्रीय सागरी सीमा रेषेजवळ ही संयुक्त कारवाई केली.

माहितीनुसार, तटरक्षक दलाची बोट जवळ येत असल्याचे पाहून, बोटीवरील तस्करांनी हे अमलीपदार्थ समुद्रात टाकले आणि आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून पळून गेले. “१२-१३ एप्रिल रोजी रात्रीच्या वेळी केलेल्या कारवाईत, भारतीय तटरक्षक दलाने गुजरात एटीएससोबत संयुक्तपणे समुद्रात गुप्तचर यंत्रणेवर आधारित अमलीपदार्थ विरोधी मोहीम हाती घेतली. अंदाजे १,८०० कोटी रुपयांचे ३०० किलोपेक्षा जास्त अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. जप्त केलेले अंमली पदार्थ मेथाम्फेटामाइन असल्याचा संशय आहे,” असे निवेदनात म्हटले आहे.

गुजरात एटीएसने दिलेल्या माहितीनुसार, तटरक्षक दलाच्या क्षेत्रातील एका आयसीजी जहाजाला आंतरराष्ट्रीय सीमा भागात एका संशयास्पद बोटीची उपस्थिती आढळून आली. चौकशीसाठी म्हणून तटरक्षक दलाची बोट तेथे वळवण्यात आली. बोट त्यांच्या दिशेने येत असल्याचे पाहताच संशयित बोटीतील तस्करांनी आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडण्यापूर्वी जहाजातील अमलीपदार्थांची खेप समुद्रात टाकून दिली. यानंतर तटरक्षक दलाच्या पथकाने रात्रीच्या कठीण परिस्थितीत शोध घेतल्यानंतर, समुद्रात टाकण्यात आलेले अमलीपदार्थ जप्त केले. जप्त करण्यात आलेले अमलीपदार्थ हे पुढील तपासासाठी पोरबंदर येथे आणण्यात आल्याची माहिती आहे.

'गुजराती' माणूस रायगडावर 'मराठी' उबाठा गडाखाली | Mahesh Vichare | Amit Shah | Sanjay Raut |

Exit mobile version