कल्याणच्या आधारवाडी तुरुंगातील विविध बॅरेक मध्ये १५ पेक्षा अधिक मोबाईल फोन मिळाल्यामुळे आधारवाडी तुरुंगाच्या तुरुंग अधीक्षक अंकुश सदाफुले यांना निलंबित करण्यात आले आहे, त्याच बरोबर कोल्हापूर आणि येरवडा तुरुंगात देखील कैद्यांकडे मोठ्या प्रमाणात मोबाईल फोन आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
कल्याण च्या आधार वाडीत तुरुंगातील कैद्यांना ठेवण्यात येणाऱ्या वेगवेगळ्या बॅरेकमध्ये मागील दोन आठवड्यात १५पेक्षा अधिक मोबाईल फोन सर्कल अधिकरी यांनी जप्त केले होते. याबाबत सर्कल आधिकरी यांनी वेळोवेळी तुरुंग अधीक्षक अंकुश सदाफुले यांना कळवून कारवाई करण्याची मागणी केली होती. मात्र सदाफुले यांनी यावर कुठलीही कारवाई केली नाही अथवा स्थानिक पोलीस ठाण्याला याबाबत सूचना देऊन तक्रार दाखल केलेली नव्हती.
हे मोबाईल फोन कुठून आले, कुठल्या कैद्यांनी या फोन वरून कुणासोबत बोलणे केले, याबाबत कुठलीही चौकशी होत नसल्यामुळे सर्कल अधिकारी यांनी ही बाब उपमहा निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिली होती. याची दखल घेत वरिष्ठ अधिकारी यांनी चौकशी करून यामध्ये दोषी आढळलेले कल्याण आधार वाडी तुरुंगाचे तुरुंग अधीक्षक अंकुश सदाफुले यांच्यावर निलंबनाची कारवाई करून विभागीय चौकशी बसवली आहे. दरम्यान पुणे जिल्ह्यातील येरवडा तुरुंगात देखील १० मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत तसेच कोल्हापूर तुरुंगातून ६ मोबाईल जप्त करण्यात आले आहे.
हे ही वाचा:
समृद्धी महामार्गावर एअर ऍम्ब्युलन्स सेवा सुरू होणार
पश्चिम बंगाल निवडणुकीत उमेदवारांचे कारनामे; मतपत्रिका चावल्या; तलावात उडी
संजय राऊतांच्या पत्रकार परिषदेत सापाची हजेरी!
२५ समोसे पडले १ लाख ४० हजारांना
कोल्हापूर मध्यवर्ती तुरुंगातील दोन अधिका-यांना गेल्या आठवड्यात तुरुंगात सहा मोबाईल फोन सापडल्याने निलंबित करण्यात आले होते, अशी पुष्टी तुरुंगाच्या पश्चिम विभागाच्या उपमहानिरीक्षक स्वाती साठे यांनी केली तसेच येरवडा मध्यवर्ती कारागृहात १० हून अधिक मोबाईल सापडले आहेत. यानंतर, एक अधिकारी आणि १४ तुरुंग कर्मचाऱ्यांची इतर विविध विभागात बदली करण्यात आल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
एका तुरुंग अधिकाऱ्याने सांगितले की, अतिरिक्त महासंचालक (तुरुंग) यांच्या आदेशानुसार तुरुंगाची विभागाकडून नियमित तपासणी केली जात आहे.येरवडा आणि कोल्हापूर तुरुंगात जप्त केलेले मोबाईल फोन हे तुरुंग अधिकाऱ्यांच्या सतर्कतेचे परिणाम आहेत आणि निष्काळजीपणा साठी जबाबदार असलेल्यांना शिक्षा आणि चौकशीला सामोरे जावे लागत आहे. अशा प्रथेला आळा घालण्यासाठी आम्ही नियमितपणे तुरुंगामध्ये झडती घेतो.
ज्यांच्या अधिकार क्षेत्रात येरवडा आणि कोल्हापूर तुरुंग येतात त्या उपमहानिरीक्षक स्वाती साठे म्हणाल्या की, कैद्यांना त्यांच्या कुटुंबीयांशी किंवा वकिलांशी वेळोवेळी बोलता यावे यासाठी बहुतांश तुरुंगांमध्ये दूरध्वनी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे, परंतु असे असतानाही कारागृहाच्या आत सेल फोनची अवैधरित्या तस्करी केली जात आहे, या मोबाईल फोन चा वापर गुन्हेगारी प्रवृत्तीचे कैदी त्याचा वापर बेकायदेशीर कामांसाठी करू शकतात आणि म्हणून अधिकारी यांच्याकडून नियमित तुरुंगाची तपासणी केली जात आहे.