नवी मुंबईतील खारघर परिसरात चोरीची घटना घडली आहे. बंदुकीच्या धाकावर तीन अज्ञात व्यक्तींनी ज्वेलर्सच्या दुकानातून तब्बल ११ लाख रुपयांचे दागिने लुटले आहेत. तसेच अनेकवेळा गोळीबार देखील केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी (२८ जुलै) रात्री १०.३० च्या सुमारास ही घटना घडली. तीन अज्ञात सशस्त्र व्यक्तींनी बीएम ज्वेलर्समध्ये शिरकाव करत लाखोंचे दागिने लंपास केले.
या चोरीच्या घटनेचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये समोर आले आहेत. फुटेजमध्ये आरोपी हेल्मेट घालून दागिन्यांच्या दुकानात घुसून कर्मचाऱ्यांना धमकावत दागिने लुटताना दिसत आहेत. आरोपींपैकी एकाने दुकानात गोळीबार केला आणि अलार्म चालू करण्याचा प्रयत्न केला तेव्हा एका कर्मचाऱ्याला मारहाण केली. काही क्षणांनंतर दागिने लुटून चोरटे घटनास्थळावरून मोटारसायकलवरून पळ काढला. स्थानिकांनी चोरट्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. मात्र, चोरटे पळण्यात यशस्वी झाले. घटनेची माहिती मिळताच नवी मुंबई पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि तपास सुरू केला.
हे ही वाचा:
दिल्ली कोचिंग सेंटर दुर्घटनेनंतर नियमांचे उल्लंघन करणारे १३ कोचिंग सेंटर्स सील
मुंबईत पुन्हा हिट अँड रन प्रकरण; बीएमडब्लूच्या धडकेत तरुणाचा मृत्यू
भारतीय नेमबाजांची कमाल, रमिता नंतर अर्जुनही अंतिम फेरीत !
भारताला नमवून श्रीलंकन महिलांनी मिळविला आशिया चषक
या घटनेबाबत बोलताना नवी मुंबई पोलिसांच्या एका अधिकाऱ्याने पीटीआय या वृत्तसंस्थेला सांगितले की, “काळे कपडे परिधान करून आणि रिव्हॉल्वरसह सज्ज असलेल्या तिघांनी दुकानात प्रवेश केला, कर्मचाऱ्यांना धमकावले, मारहाण केली आणि ११.८० लाख रुपयांचे दागिने लुटले. तीन मिनिटांत, त्यांनी चार ते पाच राऊंड गोळ्या झाडल्या, यामध्ये कोणीही जखमी झाले नाही.” आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तिन्ही आरोपींना अटक करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत, असे अधिकाऱ्याने सांगितले.