राजधानी दिल्लीत लुटीची खळबळजनक घटना समोर आली आहे. बाबा हरदासनगर परिसरात गाड्यांमधून आलेल्या चोरांनी ईडीचे अधिकारी असल्याची बतावणी करत तीन कोटी २० लाखांची लूट केली आहे. ही घटना शुक्रवारी रात्री घडली. अर्थात या संदर्भात लगेचच पोलिसांना कळवल्यानंतर तिथे गस्तीवर असणाऱ्या पोलिसांनी त्यातील एका गाडीला थांबवून त्यातून ७० लाखांची रोख रक्कम हस्तगत केली आहे.
नझफगढचा रहिवासी असणारा सुंदर (नाव बदलले आहे) गुरुग्राम येथील एका खासगी बँकेत काम करतो. त्याने त्याच्या गावच्या अडीच एकर जमिनीचा व्यवहार चार कोटी ७० लाखांत पूर्ण केला होता. एक महिन्यापूर्वी त्याला तीन कोटी २० लाख रुपये रोख आणि उर्वरित ४७ लाख आणि ६९ लाख रुपये चेकने मिळाले होते. त्याने ही सर्व रोख रक्कम घरातच ठेवली होती. शुक्रवारी रात्री आठ वाजता सुंदर खाण्यासाठी बाहेर पडला. तेव्हा दोन गाड्यांमधून पाच ते सहा जण त्याच्या जवळ आले. त्यांनी स्वतःला ईडीचे अधिकारी असल्याचे सांगत गाडीत जबरदस्तीने बसवले. गाडीमध्येच बसवून त्यांनी त्याला परिसरातच दोन तास फिरवले.
हे ही वाचा:
बोगस पासपोर्ट प्रकरणी सीबीआयचे ५० ठिकाणी छापे
इतिहास घडणार; छत्तीसगडमध्ये ‘बुलेट’वर ‘बॅलेट’चे यश
संगीत महोत्सवातील हमासच्या नृशंस हल्ल्याची हादरवणारी दृश्ये उघड!
स्वतःच्याच बंदुकीची गोळी लागून अग्निवीराचा मृत्यू!
त्यानंतर त्याला धमकावून त्याच्या घरी आणण्यात आले. त्याच्या घरी पोहोचल्यानंतर या चोरांनी त्याला त्याच्याकडे अवैध रक्कम असून ती जप्त करण्यासाठी आपण आलो आहोत, असे सांगितले. त्यानंतर या चोरांनी सुंदरने पलंगामध्ये ठेवलेले तीन कोटी २० लाख रुपये काढले. तसेच, सुंदर आणि त्याच्या आईचा फोनही ते घेऊन गेले. त्यानंतर या चोरांनी त्याला जवळच्या एका पेट्रोलपंपावर सोडून दिले. पोलिसांनी त्यांच्या गाडीला थांबवून त्यांच्याकडून ७० लाख रुपये जप्त केले. आरोपी गाडीचालकाचे नाव अमित असे आहे. फौजी नावाच्या एका माणसाने चार-पाच मुलांना आणण्यास सांगितले होते. सर्वांनी लूट केल्यानंतर हे पैसे आपापसांत वाटले, असे त्याने सांगितले.