कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव कमी होताच आणि संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता देशामध्ये लसीकरण मोहिमेला वेग आला आहे. देशातील अनेक भागांमध्ये कोरोना प्रतिबंधक लसींचा तुटवडा जाणवत असतो. दरम्यान चंद्रपूर जिल्ह्यात मात्र जवळ पास २७०० कोरोना प्रतिबंधक लसी खराब झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. अधिकाऱ्यांच्या बेशिस्त कारभारामुळे लसी खराब झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील भिसी या आरोग्य केंद्रावर हा लसी वाया गेल्याचा प्रकार घडला आहे. या गंभीर प्रकरणाची दखल घेत या प्रकरणी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी वैद्यकीय अधिकारी प्रियंका कष्टी आणि आरोग्य सहाय्यक शीला कराळे यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. १३ तारखेला या केंद्रावरील २६०० कोविशील्ड आणि १०० कोवॅक्सीन लसी डीप फ्रीझरमध्ये ठेवण्यात आल्या, ज्यामुळे या लसी खराब झाल्या असल्याची माहिती समोर आली आहे.
हे ही वाचा:
राज ठाकरेंच्या नावे खंडणी मागणारे पोलिसांच्या ताब्यात!
‘टोपे साहेब, आता विद्यार्थ्यांसाठी हेलिकॉप्टरची व्यवस्था कराच’
ठाण्यात ‘ढाण्या वाघा’चे पोस्टर्स; शिवसेनेला आव्हान दिल्याची चर्चा
कोरोना लस खराब झाल्याची घटना समोर येताच प्रशासनाने याची गंभीर दखल घेतली. दुसरीकडे अतिरिक्त कामाचा तणाव असल्याने आणि तब्येत बरी नसल्याने ही चूक झाल्याचे संबंधित कर्मचाऱ्यांनी मान्य केले आहे.
भारतामध्ये जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम सध्या सुरू आहे. भारताने या लसीकरण मोहिमेत अनेक विक्रमांना गवसणी घातली असून लवकरच एकूण शंभर कोटी लसी देण्याचा विश्वविक्रम करण्याच्या उंबरठ्यावर भारत सध्या उभा आहे.