भिवंडी शहराजवळील एका लग्न मंडपाला आग लागून तब्बल २० ते २५ दुचाकी जळून खाक झाल्याची धक्कादायक घटना रविवारी (२८ नोव्हेंबर) रात्री घडली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. अग्निशमन दलाने या आगीवर नियंत्रण मिळवले आहे. लग्न मंडपाच्या परिसरात फटाके फोडल्याने ही आग लागली होती.
भिवंडीमधील खंडूपाडा भागातील अन्सारी शुभमंगल कार्यालयामध्ये रविवारी लग्न सोहळा सुरू होता. दरम्यान काही लोकांनी मंगल कार्यालयाच्या पार्किंगच्या रिकाम्या जागेत फटाके फोडण्यास सुरुवात केली. दरम्यान अचानक लग्न मंडपाने पेट घेतला. हळूहळू ही आग पसरत पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या वाहनांपर्यंत पोहचली. या भीषण आगीत जवळपास २० ते २५ दुचाकी जळून खाक झाल्या.
हे ही वाचा:
‘83’ चित्रपटाच्या नवीन पोस्टरची चर्चा
मथुरामध्ये जमावबंदी! कृष्ण जन्मभूमीवरील मशिदीचा वाद पुन्हा येणार ऐरणीवर?
गोव्याला नमवून महाराष्ट्राच्या किशोर खोखो संघाची विजयी सलामी
आगीच्या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनेस्थळी धाव घेत तब्बल दीड- दोन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणली. मात्र, तोपर्यंत दुचाकी जळून खाक झाल्या. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
भिवंडी शहरात अनेक व्यावसायिकांनी आशा मोकळ्या जागेत शुभमंगल कार्यालये उभी केली आहेत. या कार्यालयांमध्ये कोणत्याही सुरक्षेसाठीच्या उपाययोजना केलेल्या नसून भविष्यात मोठी दुर्घटना होण्याची शक्यता असून पालिका प्रशासन याकडे लक्ष देणार का असा सवाल उपस्थित होत आहे.