उत्तर प्रदेशातील हाथरस जिल्ह्यात झालेल्या दुर्घटनेत १२१ जणांचा मृत्यू झाला. या प्रकरणी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कठोर कारवाईचे निर्देश दिले आहेत. यानंतर या संत्सगचे आयोजक नारायण साकार हरी उर्फ भोले बाबा फरार आहेत. मात्र, पोलिसांनी या प्रकरणी २० जणांना अटक केली आहे. अटक केलेल्यांची पोलीस सध्या चौकशी करत आहेत.
हाथरस येथे झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणाच्या तपासासाठी हाथरस पोलिसांनी सात पथके तयार केली आहेत. मुख्य सेवेदार देवप्रकाश मधुकर यांचा शोध सुरू आहे. योगी सरकारने या संपूर्ण प्रकरणात कठोर भूमिका घेतली आहे. दरम्यान, नारायण साकार हरी उर्फ भोले बाबा हे फरार असून त्यांनी पात्र लिहून या घटनेचा शोक व्यक्त केला आहे. तर, त्यांनी चेंगराचेंगरीची घटना ही काही समाजकंटकांमुळे झाल्याचे म्हटले आहे.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सूचनेनुसार, गृह विभागाने बुधवारी सायंकाळी उशिरा अलाहाबाद उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश, न्यायमूर्ती ब्रजेश कुमार श्रीवास्तव द्वितीय यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यीय चौकशी आयोगाची स्थापना केली. आयोगाचे मुख्यालय लखनऊ येथे असणार आहे. आयोगाला दोन महिन्यांत चौकशी पूर्ण करावी लागणार आहे. हाथरस येथे २ जुलै रोजी झालेल्या घटनेची चौकशी आयोगाकडे सोपवण्यात आली आहे. आयोजकांनी परवानगी देताना घातलेल्या अटींचे पालन केले की नाही, याची चौकशी आयोग करेल. हा अपघात आहे की नियोजित कट आहे हेही आयोग पाहणार आहे. प्रशासनाने केलेल्या व्यवस्थेची चौकशी करण्याची जबाबदारीही आयोगाला देण्यात आली आहे. भविष्यात असे अपघात टाळण्यासाठी उपाययोजनाही आयोग सुचवणार आहे.
हे ही वाचा:
भोले बाबा म्हणतात हाथरसमध्ये समाजकंटकांमुळे झाली चेंगराचेंगरी
चाहत्यांची प्रतीक्षा संपली; अखेर टी- २० वर्ल्ड कपसह भारतीय संघ मायदेशी परतला
हिंदूंविरोधात वक्तव्य करणाऱ्या राहुल गांधींच्या विरोधात विहिंपकडून निदर्शने
भारतीय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘कू’ बंद
माहितीनुसार, भोले बाबांच्या संपत्तीशी संबंधित काही कागदपत्रे मिळाली आहेत. उत्तर प्रदेशातील मैनपुरी येथे बाबाचा १३ एकरात पसरलेला आश्रम असून त्याची किंमत ४ कोटी रुपये आहे. या आश्रमात अनेक खोल्या आहेत. या खोल्यांमध्ये ५ स्टार हॉटेल्ससारख्या सुविधाही आहेत. या आश्रमात सूरज पाल राहत होते आणि ६ खोल्या फक्त त्यांच्यासाठीच होत्या. इतर ६ खोल्या समिती सदस्य आणि संस्थेसाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी ठेवण्यात आल्या होत्या. विशेष म्हणजे आश्रमात जाण्यासाठी एक खासगी रस्ता होता आणि त्यात अत्याधुनिक उपहारगृहाचाही समावेश आहे. अहवालानुसार, तीन- चार वर्षांपूर्वी आश्रमाची जमीन भेट म्हणून देण्यात आली होती. परंतु, कागदपत्रांवरून असे दिसून आले की त्यांच्याकडे कोट्यवधी रुपयांच्या इतर अनेक मालमत्ता आहेत.