बिहारमध्ये विषारी दारूने दोन मृत्युमुखी; तिघांनी गमावले डोळे !

पीडितांनी दोन-तीन दिवसांपूर्वी दारू घेतली होती

बिहारमध्ये विषारी दारूने दोन मृत्युमुखी;  तिघांनी गमावले डोळे !

बिहारमधील मुझफ्फरपूरमध्ये विषारी दारू प्यायल्याने दोघांचा मृत्यू झाला आहे आणि तिघांची दृष्टी गेली आहे.पीडितेने काही दिवसांपूर्वी दारू प्राशन केल्याची माहिती मिळाली आहे.

बिहारच्या मुझफ्फरपूर जिल्ह्यात दारू पिऊन दोघांना आपला जीव गमवावा लागला असून तिघे जण दृष्टीहीन झाल्याचे पोलिसांनी रविवारी सांगितले. पोखरिया पीर येथील काही लोकांची प्रकृती खालावल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यावर ही घटना उघडकीस आली.पोलिसांनी तपास केला असता पीडितांनी दोन ते तीन दिवसांपूर्वी बनावट दारू प्राशन केल्याचे समोर आले आहे.पिडीतांनी एकाच ठिकाणावरून दारूचे सेवन केले की आणखी कोणते कारण आहे याचा तपास पोलीस करत आहेत.

हे ही वाचा:

कैसमीच्या भारतीय संगीत प्रेमाची पंतप्रधानांनी घेतली दखल

चांद्रयान ३, जी-२० परिषदेने भारताला शिखरावर नेले!

भारताची पहिल्या दिवशी दमदार कामगिरी, ५ पदकांची कमाई

भारताच्या जी-२० अध्यक्षपदाची संयुक्त राष्ट्रांकडून स्तुती !

मिळालेल्या माहितीनुसार, दृष्टी गमावलेल्या पीडितांपैकी धर्मेंद्र राम याने शिवचंद्र पासवान याच्या ठिकाणावरून दारू प्राशन केल्याचे उघड झाले.शिवचंद्र पासवान हा निकृष्ट दर्जाच्या आणि भेसळयुक्त दारू विक्रीसाठी प्रसिद्ध आहे.पीडित धर्मेंद्र याने शंभर रुपयांत दोन ग्लास दारू प्यायला होता त्यानंतर त्याची दृष्टी हळूहळू कमी झाल्याचे त्याने सांगितले.पीडितांच्या जबाबाच्या आधारे पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या पैकी एक स्थानिक रहिवासी असून यापूर्वी देखील दारूच्या गुन्ह्यात तो तुरुंगात गेला असल्याचे तपासात उघड झाले.पोलिसांनी शिवचंद्र पासवान यांच्या पत्नी आणि मुलीलाही चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

दरम्यान, निकृष्ट दर्जाच्या आणि भेसळयुक्त दारूच्या सेवनामुळेच हे मृत्यू आणि दृष्टी गमावल्याची घटना झाली असल्याचे एका पोलिसाने सांगितले.भविष्यात असे प्रकार पुन्हा घडू नयेत यासाठी चौकशी करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
मुझफ्फरपूरचे एसपी अभिषेक दीक्षित यांनी सांगितले की, अचानक दोघांची प्रकृती बिघडून मृत्यू झाल्याची माहिती आम्हाला मिळाली. प्राथमिक चौकशीत त्यांनी देशी दारूचे सेवन केल्याचे समोर आले आहे. या मृत्यूंप्रकरणी आम्ही दोघांना अटक केली असल्याचे त्यांनी सांगितले.तसेच बिहारच्या मोतिहारी जिल्ह्यात बनावट मद्य प्राशन केल्याने २७ जणांना आपला जीव गमवावा लागला होता. त्यानंतर काही महिन्यांनी ही घटना घडली आहे.

Exit mobile version