प. बंगालमध्ये कायदा-सुव्यवस्थेचे तीन तेरा; पंचायत निवडणुकीत १८ ठार

हिंसाचारात मालमत्तांचे अतोनात नुकसान

प. बंगालमध्ये कायदा-सुव्यवस्थेचे तीन तेरा; पंचायत निवडणुकीत १८ ठार

प. बंगालमधील पंचायत निवडणुकीला हिंसाचाराचे गालबोट लागले. उत्तर २४ परगणा, दक्षिण २४ परगणा आणि मुर्शिदाबाद जिल्ह्यांत सर्वाधिक हिंसाचाराच्या घटना घडल्या असून शुक्रवारपासून सुमारे १८ जणांचा यात मृत्यू झाला आहे. अनेक जिल्ह्यांत मतदान केंद्रे ताब्यात घेण्याच्या आणि त्यांची नासधूस करण्याच्याही घटना घडल्या. हिंसाचारानंतर राज्यातील सत्ताधारी तृणमूल काँग्रेस आणि भाजपने एकमेकांना दोष देत अनेक ठिकाणी पुन्हा निवडणुका घेण्याची मागणी केली आहे.

शनिवारी झालेल्या पंचायत निवडणुकीत १८ जण मारले गेले. त्यात तृणमूल काँग्रेसच्या १०, भाजप आणि काँग्रेसच्या प्रत्येकी तीन आणि माकपच्या दोघा कार्यकर्त्यांचा समावेश होता. अनेक ठिकाणी मतदानपेट्यांचीही नासधूस करण्यात आली. कूचबिहार जिल्ह्यातील दिन्हाता येथील एका शाळेत मतदानाचे केंद्र होते. तेथील मतदानपेट्यांची नासधूस करण्यात आली आणि मतदान पत्रे पेटवून देण्यात आली.

बार्नाचायना भागातही स्थानिकांनी चुकीचे मतदान झाल्याचा आरोप करत मतपेट्या आणि मतपत्रांना आग लावली. बारासात येथून मतपेट्यांची नासधूस झाल्याच्या १३०० तक्रारी आल्याची माहिती निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली. रविवारी याबाबत विस्तृत पडताळणी केली जाणार आहे. जेथे अधिकाधिक हिंसाचारांची नोंद झाली, आणि जेथे मतदानच होऊ शकले नाही, तिथे पुन्हा निवडणुका घेतल्या जातील, असेही त्यांनी सांगितले. काही दंगलखोरांनी मुर्शिदाबाद जिल्ह्यात पोलिसांची गाडीही पेटवून दिली.

माकपचे राज्य सचिव मोहम्मद सलिम यांनीही उघड्यावर पडलेल्या मतपेट्याचे छायाचित्र पोस्ट करून ‘मतदान संपले. एका मतदान केंद्रावरील मतपत्रे, मतपेट्यांची ही अवस्था. हे दृश्य डायमंड हार्बरचे आहे,’ असे ट्वीट केले. तर, पश्चिम बंगालचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अधिर रंजन चौधरी यांनी ममता बॅनर्जी यांचे अभिनंदन करणारी उपहासात्मक पोस्ट लिहिली. ‘अभिनंदन दीदी, तुम्ही पंचायत निवडणुका जिंकल्या आहेत,’ असे ट्वीट त्यांनी केले आहे.

हे ही वाचा:

रेल्वेचे भाडे २५% टक्के पर्यंत होणार कमी; वंदेभारतचाही समावेश !

शरद पवार पुन्हा भिजले!

पाकिस्तानातील नव्या पिढीतील महिलांना आवडते साडी…

प्रदीप कुरुलकर त्या पाक एजंटकडे आकर्षित झाले आणि खूप काही सांगून बसले!

‘निवडणूक शनिवारी सकाळी सुरू होणे अपेक्षित असताना मतपेट्या शुक्रवारी रात्रीच बाहेर काढण्यात आल्या. चुकीचे मतदान केले गेले आणि मतपत्रे त्या मतपेट्यांमध्ये ठेवण्यात आली. आणि पुन्हा त्या मतपेट्या मतदान केंद्रांमध्ये ठेवण्यात आल्या,’ असा आरोप चौधरी यांनी केला. तर, तृणमूलचे वरिष्ठ मंत्री सशी पांजा यांनी भाजप, माकप आणि काँग्रेसमुळे हिंसाचाराच्या घटना घडल्याचा आरोप केला आहे, तसेच, केंद्रीय दलाच्या भूमिकेबाबतही शंका उपस्थित केली आहे. या वाढत्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर भाजप नेते सुवेंदू अधिकाऱ्यांनी प. बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे.

‘हिंसा हाच ममतांचा सत्तेसाठीचा राजमार्ग’

या हिंसाचारासाठी भाजपने सत्ताधारी तृणमूल काँग्रेसला जबाबदार धरले आहे. ‘हत्या किंवा गोंधळाशिवाय त्या राज्यात निवडणुका घेऊच शकत नाहीत,’ अशी टीका केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर केली. ‘ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेसचा विश्वास आहे की, हत्या हाच सत्तेत जाण्याचा राजमार्ग आहे. मात्र बंगालची ही संस्कृती भारतासाठी आणि देशासाठी जगभरात लाजिरवाणी बाब आहे,’ असे ते म्हणाले.

Exit mobile version