काँग्रेसची कोंडी; आयकर विभागाकडून १७०० कोटींची नोटीस

दंड आणि व्याज दोन्हीचा समावेश

काँग्रेसची कोंडी; आयकर विभागाकडून १७०० कोटींची नोटीस

लोकसभा निवडणुक अगदी काही दिवसांवर आलेली असताना काँग्रेस पक्षाच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. प्राप्तिकर विभागाने काँग्रेसभोवतीचा फास चांगलाच आवळून कर वसुलीची नोटीस बजावली आहे. आयकर विभागाने काँग्रेस पक्षाला १७०० कोटींची नोटीस पाठवली आहे. आयकर विभागाची नवीन मागणी २०१७-१८ ते २०२०-२१ या वर्षांसाठी आहे. यात दंड आणि व्याज दोन्हीचा समावेश असल्याची माहिती आहे.

प्राप्तिकर विभागाने काँग्रेस पक्षाकडून करवसुलीबाबत सुरू केलेली प्रक्रिया थांबवावी, या मागणीसाठी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. ही याचिका गुरुवारी न्यायालयाने फेटाळून लावली. या दणक्यातून सावरताचं विभागाने लगेचच पक्षाला वसुलीची नोटीस पाठवली आहे. ही वसुली २०१७-१८ आणि २०२०-२१ या दोन वर्षांतील आहे. आयकर विभाग २०२१-२२ ते २०२४-२५ पर्यंतच्या उत्पन्नाच्या पुनर्मूल्यांकनाची वाट पाहत आहे. याची मुदत रविवार संपणार आहे. आयकर विभागाची ही कारवाई लोकशाहीविरोधी आणि अन्यायकारक असल्याचे म्हणत कॉंग्रेसने टीका केली आहे.

गुरुवारी पक्षाला सुमारे १,७०० कोटी रुपयांची नवीन नोटीस महत्त्वाच्या कागदपत्रांशिवाय पाठवण्यात आली आहे, असा आरोप काँग्रेसचे वकील विवेक तंखा यांनी केला आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने गुरुवारी काँग्रेसच्या याचिका फेटाळून लावल्या. न्यायमूर्ती यशवंत वर्मा आणि न्यायमूर्ती पुरुषेंद्र कुमार कौरव यांच्या खंडपीठाने सांगितले की, या याचिका त्याच्या आधीच्या निकालाच्या अनुषंगाने फेटाळण्यात आल्या आहेत, आणखी एका वर्षासाठी पुनर्मूल्यांकन सुरू करण्यात हस्तक्षेप करण्यास नकार दिला आहे. सध्याची बाब २०१७ ते २०२१ या वर्षातील मूल्यांकनाशी संबंधित आहे.

हे ही वाचा:

डीपफेक हे मोठं आव्हान; एआय जनरेटेड गोष्टींवर वॉटरमार्क हवा

वकिलांच्या पत्रानंतर पंतप्रधान मोदी यांची काँग्रेस नेत्यांवर टीका

२०५० पर्यंत सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून भारत उदयास येणार

जम्मूहून श्रीनगरला जाणारी टॅक्सी दरीत कोसळून १० जणांचा मृत्यू

प्राप्तिकर विभागाने २०१७ ते २०२१ या चार वर्षांच्या काळातील काँग्रेसच्या बँक व्यवहाराची तपासणी सुरू केली आहे. त्याविरोधात पक्षाकडून याचिका दाखल करण्यात आली होती. त्याआधी २०१४-१५ ते २०१६-१७ या कालावधीतील तपासणी करून पक्षाला वसुलीची नोटीस पाठवली होती. त्यानंतर पक्षाची बँक खाती गोठवण्यात आली. त्यावेळी सुमारे दीडशे कोटींची वसुलीही करण्यात आली होती. आता तब्बल १ हजार ७०० कोटींची नोटीस पाठवण्यात आल्याने काँग्रेससमोर अडचणी वाढल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, माजी अध्यक्षा सोनिया गांधी, नेते राहुल गांधी यांनी एकत्रितपणे पत्रकार परिषद घेत लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी तसेच पक्षाच्या इतर कामांसाठी पैसे नसल्याचा दावा केला होता.

Exit mobile version