सांगलीमधील जत तालुक्यातील उमदी येथील आश्रम शाळेतील मुलांना विषबाधा झाल्याची घटना समोर आली आहे. समता आश्रम शाळेतील जवळपास शंभरहून अधिक विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा झाली आहे. यानंतर विषबाधा झालेल्या मुलांवर तातडीने उपचार सुरु करण्यात आले आहेत. या घटनेची संपूर्ण चौकशी करून २४ तासाच्या आत अहवाल सादर करण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी समाजकल्याण विभागाच्या सहायक आयुक्तांना सूचना देण्यात आल्या आहेत.
उमदी येथे रविवार, २७ ऑगस्ट रोजी एका मंगल कार्यालयात कार्यक्रम होता. तेथील शिल्लक राहिलेले जेवण आश्रमशाळेतील मुलांना देण्यात आले. एका डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमांमध्ये शिल्लक राहिलेले जेवण आणि बासुंदी दिल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मुलांनी हे जेवण खाल्ल्यानंतर उलट्या सुरू झाल्या अशी माहिती स्थानिकांनी दिली आहे. काही वेळानंतर जेवून झाल्यानंतर या मुलांना त्रास होऊ लागला. मुलांना उलट्या होऊ लागल्यानंतर त्यांना माडग्याळ येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जवळपास १७० मुलांना त्रास झाला असून काहींची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना मिरज येथील शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले आहे. अजूनही काही मुले ग्रामीण रुग्णालयात दाखल होत आहेत.
हे ही वाचा:
भारताच्या पुरुष ऍथलेटिक्स संघाने विक्रमी वेगाने अंतिम फेरीत मारली धडक
ऑनलाइन काम करणाऱ्यांना आम्ही लाइनवर आणले!
भारत चंद्रावर पोहोचला, आम्ही मात्र मध्येच अडकलोय…पाकिस्तान टीव्हीवर चर्चा
आदित्य एल-१ मोहीम उलगडणार सूर्याचे कोडे
उमदीमध्ये विमुक्त जाती भटक्या जमाती प्रवर्गातील समता अनुदानित आश्रमशाळा चालवली जाते. जवळपास २०० च्या आसपास मुले-मुली या आश्रमशाळेत आहे. जिल्हाधिकारी यांनी घटनेची माहिती आणि दखल घेतली असून विद्यार्थ्यांच्या उपचारात कोणतीही उणीव ठेवू नये, अशा सूचना त्यांनी दिल्या आहेत. तसेच, समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त यांना सदर घटनेची संपूर्ण चौकशी करून २४ तासाच्या आत अहवाल सादर करण्याच्या आणि दोषींवर कारवाई करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी दिल्या आहेत.