भारत सरकारकडून काही युट्युब चॅनलवर कारवाई करण्यात आली आहे. भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने १६ युट्युब चॅनल्स ब्लॉक केले आहेत. हे युट्यूब चॅनल्स देशविरोधी विचार, जातीय द्वेष आणि भारतात दहशतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचे आढळून आले होते.
भारत सरकारने IT नियम २०२१ अंतर्गत आपत्कालीन अधिकारांचा वापर करून हे युट्यूब चॅनेल ब्लॉक केले आहेत. भारताची राष्ट्रीय सुरक्षा, परराष्ट्र संबंध आणि सार्वजनिक सुव्यवस्थेशी संबंधित प्रचार करणाऱ्या एकूण १६ यूट्यूब न्यूज चॅनल्सला ब्लॉक करण्यात आले आहे. या १६ यूट्यूब चॅनल्सपैकी १० भारतीय आणि सहा पाकिस्तानमधून कार्यरत होते. या चॅनेल्सचे ६८ कोटींहून अधिक सबस्क्रायबर्स होते.
हे ही वाचा:
राणांच्या घरात घुसू पाहणाऱ्या शिवसैनिकांना एका दिवसात जामीन
फ्रान्सची सूत्रे पुन्हा मॅक्रोनच्याच हाती
जातीवरून हिणवत छळ केल्याचा नवनीत राणांचा आरोप
यापूर्वीही केंद्र सरकारने अशाच २० युट्यूब चॅनल्स आणि दोन वेबसाईट्सवर बंदी घातली होती. यापुढेही केंद्र सरकार अशा वेबसाईट्स आणि युट्यूबवर कारवाई सुरूच ठेवणार असल्याचा इशारा केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिला होता. बंदी घातलेले ते युट्यूब चॅनल्स आणि वेबसाईट्स हे पाकिस्तानमधून चालवले जात होते. ते भारतासंबंधी संवेदनशील विषयांवर खोटी माहिती पसरवत होते. या वेबसाईट्स आणि युट्यूब चॅनल्सवर काश्मीर, भारतीय सैन्य, राम मंदीर, जनरल बिपीन रावत, भारतातील अल्पसंख्याक समुह आदी विषयांवर चुकीची माहिती पसरवली जात असल्याचे अनुराग ठाकूर यांनी सांगितले होते.