नागपूरनंतर सांगलीतही संचारबंदी लागू

नागपूरनंतर सांगलीतही संचारबंदी लागू

त्रिपुरा येथील कथित घटनेचे पडसाद जिल्ह्यात उमटू नयेत, यासाठी सांगली जिल्हा प्रशासनाने विशेष खबरदारी घेत मंगळवारपासून जिल्ह्यात जमावबंदीचे आदेश लागू केले आहेत. फौजदारी प्रक्रिया संहिता कलम १४४ अन्वये ही कार्यवाही केली जाणार असून त्याआधी सांगली शहरात पोलिसांनी संचलन करून इशारा दिला आहे.

जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी यासंदर्भातील आदेश दिले आहेत. सांगलीमध्येही कथित घटनेचा फायदा घेऊन काही समाज कंटकांकडून हिंसाचार होण्याची शक्यता वर्तवत जिल्हाधिकाऱ्यांनी १५ नोव्हेंबरच्या रात्रीपासून ते २० नोव्हेंबर पर्यंत खबरदारीचा उपाय म्हणून कलम १४४ लागू केला आहे. सभा घेण्यास, पाच पेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास आणि शस्त्र किंवा लाठीकाठी जवळ बाळगण्यास बंदी घालण्यात आली आहे.

हे ही वाचा:

रझा अकादमी, अर्जुन खोतकर नितेश राणेंच्या निशाण्यावर

पूजा ददलानीला तिसरे समन्स; त्यानंतर काय?

वय इथले संपत नाही; १०४ वर्षांच्या आजीने मिळविले ८९ गुण

राज्याला फडणवीसांसारख्या फुलटाईम मुख्यमंत्र्याची गरज

शुक्रवारी १२ नोव्हेंबर रोजी अमरावतीमध्ये बंदला हिंसक वळण लागून दगडफेक व तोडफोडीच्या घटना घडल्या होत्या. राज्य सरकारने या घटनांची दखल घेत अमरावती येथे कलम १४४ लागू केले असून अजूनही परिसरातील इंटरनेट सेवा बंद आहे. याच पार्श्वभूमीवर नागपुरातही कालपासून १४४ लागू करण्यात आले आहे.

नागपूरमध्ये पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी १४४ कलम लागू केले आहे. शहरात संवेदनशील परिसरात साध्या वेशात पोलीस तैनात करण्यात आले आहेत. तसेच शहरात मोर्चे आणि आंदोलनाला परवानगी नाकारण्यात आली आहे. त्रिपुरा येथील कथित घटनेचे अमरावती, नांदेड आणि मालेगाव येथे तीव्र पडसाद उमटले होते. अमरावती येथे मोठा हिंसाचार झाला.

Exit mobile version