दिल्लीतील जुन्या राजिंदर नगर भागात ‘राव आयएएस कोचिंग सेंटर’ इमारतीच्या तळघरात अचानक पाणी साचल्याने तीन विद्यार्थ्यांना आपला जीव गमवावा लागला. या घटनेनंतर दिल्ली महानगरपालिकेने तातडीने कारवाई केली आहे. जुन्या राजिंदर नगर भागातील नियमांचे उल्लंघन करणारे १३ कोचिंग सेंटर्स सील करण्यात आले आहेत.
दिल्लीच्या महापौर शेली ओबेरॉय यांनी सांगितले की, नागरी संस्थेच्या एका पथकाने रविवारी परिसरातील अनेक कोचिंग सेंटर्सची झडती घेतली आणि तळघरात वर्ग किंवा उपक्रम राबविणाऱ्या कोचिंग सेंटर्सवर कारवाई करण्यात आली आहे. “कालच्या दुःखद घटनेनंतर, दिल्ली महानगरपालिकेने तळघरात नियमांचे उल्लंघन करणाऱ्या राजिंदर नगरमधील सर्व कोचिंग सेंटर्स सील करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. आवश्यक असल्यास, ही मोहीम संपूर्ण दिल्लीत चालविली जाईल,” असं महापौरांनी स्पष्ट केले आहे.
शेली ओबेरॉय यांनी दिल्ली महानगरपालिका आयुक्तांना नागरी संस्थेच्या अखत्यारीत असलेल्या आणि तळघरांमध्ये व्यावसायिक क्लास चालवणाऱ्या, इमारत उपनियमांचे उल्लंघन करणाऱ्या दिल्लीतील सर्व कोचिंग सेंटर्सवर कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले आहे. तसेच ‘राव आयएएस कोचिंग सेंटर’मधील घटनेसाठी महानगर पालिकेचे कोणते अधिकारी जबाबदार आहेत की नाही हे तपासण्यासाठी तातडीने चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. कोणताही अधिकारी दोषी आढळल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, अशी भूमिकाहे एत्यांनी स्पष्ट केली आहे.
हे ही वाचा:
मुंबईत पुन्हा हिट अँड रन प्रकरण; बीएमडब्लूच्या धडकेत तरुणाचा मृत्यू
भारतीय नेमबाजांची कमाल, रमिता नंतर अर्जुनही अंतिम फेरीत !
भारताला नमवून श्रीलंकन महिलांनी मिळविला आशिया चषक
मनू भाकर म्हणते, श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलेल्या मार्गावर चालले!
गेल्या वर्षी, मुखर्जी नगर येथील आयएएस कोचिंग इन्स्टिट्यूटला भीषण आग लागल्यानंतर, इमारत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कोचिंग सेंटर्सचे सर्वेक्षण सुरू करण्यात आले होते. मात्र, महापालिकेची कारवाई मध्यंतरी थांबल्याचा आरोप होत आहे. या वर्षी मे महिन्यात, दिल्ली उच्च न्यायालयने दिल्ली महानगर पालिका आणि दिल्ली विकास प्राधिकरणाला अग्निसुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन करणारे कोचिंग सेंटर्स त्वरित बंद करण्याचे निर्देश दिले होते.