शनिवारी झालेला केमिस्ट्रीचा पेपर मुंबईत फुटल्याची माहिती समोर आल्यानंतर आता बारावीचा आजचा गणिताचा पेपर फुटला आहे. अहमदनगरमधील श्रीगोंद्यातील विद्यार्थ्यांना पेपर सुरू होण्यापूर्वी सुमारे पाऊण तास आधी उत्तरांसहित प्रश्नपत्रिका मोबाईलवर मिळाल्याचे समोर आले आहे. याबाबत गट शिक्षण विभागाने मोबाईलवर आलेली प्रश्नपत्रिका आणि परीक्षेची प्रश्नपत्रिका एकच असल्याचा दुजोरा दिला आहे.
आज सकाळी साडेदहा वाजता गणित या विषयाचा पेपर होता. मात्र त्यापूर्वीच सुमारे पावणे दहा वाजताच्या सुमारास श्रीगोंद्यातील विद्यार्थ्यांच्या मोबाईलवर ही प्रश्नपत्रिका उत्तरासहित मिळाली होती. उत्तरासहित प्रश्नपत्रिका आल्याने हा पेपर काही काळ अगोदरच फुटला असावा अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान याबाबत शिक्षण विभाग तसेच परीक्षेला असणाऱ्या शिक्षकांना कुठलीच माहिती नसल्याची माहिती आहे.
हे ही वाचा:
फडणवीस यांना पाठवण्यात आलेली नोटीस ही आरोपी म्हणून नाही
जागतिक बाजारात भारतातल्या स्टीलला मोठी मागणी
दहशतवादाशी संबंधित ८१ जणांना सौदी अरेबियात फाशी
कॅनडामध्ये अपघातात पाच विद्यार्थ्यांना मृत्यू
शनिवारी बारावीचा केमिस्ट्रीचा पेपर झाला होता. मात्र, परीक्षेआधीच हा पेपर विद्यार्थ्यांच्या मोबाइलवर आला होता. या प्रकरणी विलेपार्ले पोलिसांनी मालाड येथील एका खासगी कोचिंग क्लासेसच्या शिक्षकाला अटक केली आहे. या शिक्षकाने बारावी केमिस्ट्रीचा पेपर आपल्या विद्यार्थ्यांना दिल्याची माहिती समोर आली आहे. विले पार्लेतील साठ्ये महाविद्यालयात एक विद्यार्थीनी उशीराने आल्याने तिच्या चौकशी दरम्यान हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता.
केमिस्ट्री विषयाचा १२ वी परीक्षेचा पेपर शनिवारी फुटल्याचे विधान परिषद सदस्य निरंजन डावखरे यांनी सभागृहात सांगितले. यासंदर्भात शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी केमिस्ट्री विषयाचा पेपर फुटला नसल्याचे सभागृहात सांगितले. या प्रश्नपत्रिकेचे वाटप केल्यानंतर प्रश्नपत्रिकेचा काही भाग व्हॉट्सअपच्या माध्यमातून एका विद्यार्थीनीच्या मोबाईलवर आढळल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असल्याची माहितीही त्यांनी सभागृहात दिली.