माजी आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी मुंबई गुन्हे शाखेने ११ वी अटक केली आहे. अटक करण्यात आलेला व्यक्ती कैथल, हरियाणात दारूचे दुकान चालवतो आणि या प्रकरणातील फरार संशयित झीशान अख्तरला मदत केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. त्याला हत्येमागील संपूर्ण कटाची माहिती होती, तसेच आरोपी क्रिकेट सामन्यांवर सट्टा लावण्यात गुंतलेला आहे.
अमित हिसमसिंग कुमार (२९) असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव असून, मुंबई गुन्हे शाखेने त्याला अटक केली आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, २४ जून रोजी तुरुंगातून सुटलेला झिशान अख्तर एका मित्राच्या माध्यमातून अमितला भेटला होता. अख्तरने अमितच्या बँक खात्यात २.५० लाख रुपये ट्रान्सफर केले होते. अमितने आठ हप्त्यांमध्ये पैसे काढून अख्तरला दिले.
एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने खुलासा केला की, अमितवर कैथलमध्ये यापूर्वी चार गुन्हे दाखल आहेत. ज्यात प्राणघातक हल्ला आणि दंगलीचे आरोप आहेत. कैथल येथील रहिवासी असलेल्या अमितचे शिक्षण बारावीपर्यंत झाले आहे. अख्तर बाबा सिद्दीकीच्या हत्येची योजना आखत होता याची पूर्ण जाणीव असलेल्या अमित कुमारने अख्तरला आर्थिक सहाय्य केल्याची माहिती आहे.
हे ही वाचा:
दहशतवाद-फंडिंगशी लढा देत, तरुणांना कट्टरतावादाकडे जाण्यापासून रोखायचय!
टीएमसी खासदाराचा मुस्लीम मतांसाठी किती आटापिटा?
ब्रिगेडनेही साथ सोडली; नंगा नहाएगा क्या, निचोडेगा क्या?
शाही ईदगाह वादाची प्रकरणे एकत्रित करण्याच्या आदेशाविरुद्धचा मुस्लीम पक्षाचा रिकॉल अर्ज फेटाळला
या प्रकरणातील आणखी एक अटक करण्यात आलेला संशयित गुरमेल सिंग हा देखील अमितच्या जिल्ह्यातील आहे. अमित आणि गुरमेल या दोघांची ओळख झीशान अख्तरशी एका मित्राने करून दिली होती. पकडले जाण्याच्या भीतीने लपून बसलेल्या अमितला मुंबई गुन्हे शाखेने हरियाणात अटक केली.
बाबा सिद्दीकी यांची १२ ऑक्टोबर रोजी मुंबईतील वांद्रे भागात आमदार मुलगा झीशान सिद्दीकीच्या कार्यालयाबाहेर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या हत्येमागचा हेतू अद्याप तपासकर्त्यांना समजलेला नाही. ते कॉन्ट्रॅक्ट किलिंग, व्यावसायिक शत्रुत्व आणि मुंबईतील झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाशी संबंधित धमक्या या चारही कोनातून तपास करीत आहे.
आतापर्यंत पोलिसांनी धर्मराज कश्यप आणि गुरमेल सिंग या दोन संशयित शूटर्ससह ११ जणांना अटक केली आहे. मात्र, मुख्य शूटर शिवकुमार गौतम आणि दोन प्रमुख सूत्रधार झीशान अख्तर आणि शुभम लोणकर हे अद्याप फरार आहेत. ते देशातून पळून जाऊ नयेत यासाठी त्यांच्या विरोधात लुकआउट परिपत्रक जारी करण्यात आले आहे.