दहशतवादी समजून गोळीबार, ११ मजूर ठार  

दहशतवादी समजून गोळीबार, ११ मजूर ठार  

नागालँडमध्ये हिंसाचाराची धक्कादायक घटना घडली असून, या घटनेत ११ जणांचा मृत्यू झाला आहे. ही घटना मोन जिल्ह्यातील ओटींग गावामध्ये घडली आहे. या घटनेनंतर परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. दहशतवादी असल्याच्या संशयातून लोकांवर गोळीबार करण्यात आल्याचे वृत्त आहे. या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी सुरक्षा दलाच्या गाड्या पेटवून दिल्याचेही समोर आले आहे.

ठार झालेले पीडित हे मजूर होते. त्यांचे काम झाल्यावर हे मजूर पिक अपमधून त्यांच्या घराकडे जात होते. सुरक्षा दलांना अतिरेकी कारवायांबद्दल माहिती मिळाली होती त्यानुसार सुरक्षा दलांनी तपासाला सुरुवात केली होती. या मजुरांच्या गाड्या थांबवण्याचे आवाहन करण्यात आले होते मात्र, गाड्या थांबल्या नाहीत आणि गाडीत दहशतवादी असल्याच्या संशयावरून सुरक्षा दलाकडून गोळीबार केल्याची माहिती समोर आली आहे. रात्री उशिरापर्यंत मजूर गावात न आल्यामुळे गावकऱ्यांनी मजुरांचा शोध घ्यायला सुरुवात केली आणि ही घटना समोर आली.

हे ही वाचा:

भारतीय लष्करी अधिकारी पाकिस्तानी हॅकर्सचे लक्ष्य

राज्यात सापडला ओमिक्रोनचा पहिला रुग्ण

अख्तरांच्या दिव्याखाली अंधार

दुसऱ्या कसोटीत किवींवर भारतीय गोलंदाजांचे वर्चस्व

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि नागालँडचे मुख्यमंत्री नेफियू रिओ यांनी या घटनेचा निषेध केला असून गोळीबारादरम्यान नागरिकांचा झालेला मृत्यू ही घटना दुर्दैवी असल्याचे म्हटले आहे. या प्रकरणाच्या एसआयटी चौकशीचे आदेश दिले आहेत. या चौकशीत दोषी असलेल्यांवर कारवाई केली जाईल, असे अमित शहांनी म्हटले आहे. दरम्यान, या घटनेप्रकरणी भारतीय लष्करानेही चौकशीचे आदेश दिले आहेत आणि भारतीय लष्कराकडून घटनेबद्दल खेद व्यक्त करण्यात आला आहे.

Exit mobile version