नागपुरात होमगार्डनेचं तरुणांना मारहाण करत लुटले १० हजार

मारहाणीत एका तरुणाचा मृत्यू

नागपुरात होमगार्डनेचं तरुणांना मारहाण करत लुटले १० हजार

नागपूरमध्ये एका होमगार्डनेचं युवकांना मारहाण करून त्यांच्याकडून पैसे लुटल्याची घटना घडली आहे. कार्तिक पौर्णिमेनिमित्त रामटेक गड मंदिरावरून परत येत असताना दोन युवकांना होमगार्ड आणि त्याच्या साथीदारांनी बेदम मारहाण केली. तसेच ऑनलाइन १० हजार रुपयेही लुबाडले. मनीष भारती (रा. अंबाडा, रामटेक) असे आरोपीचे नाव आहे.

सीतापूर (पवनी) येथील विवेक खोब्रागडे आणि फैजान पठाण हे दुचाकीने गड मंदिरावरून पवनीकडे रात्रीच्या वेळेस निघाले होते. दरम्यान होमगार्ड मनीष भारती हा त्याची दुचाकी घेऊन रस्त्यावर उभा होता. त्यासोबत पाच ते सहा साथीदार होते. त्यावेळी विवेक आणि फैजान यांना थांबवून काही न समजण्याआधीच दोघांनाही बेदम मारण्यास सुरुवात केली. मनीष या दोघांचेही काहीही ऐकून घेत नव्हता. तसेच पैसे दिले नाही तर पेट्रोलने त्यांना पेटवून देण्याचीही धमकी देण्यात आली.

काही वेळानंतर आरोपी मनीष आणि त्याच्या साथीदारांनी मारणे थांबविले. तसेच गाडीची नुकसानभरपाई म्हणून १० हजार रुपयांची मागणी केली. तेव्हा फैजान याने त्याचा भाऊ रेहानला फोन करून पवनीवरून बोलावले. रोख नसल्यामुळे नंतर पैसे देऊ, असे सांगितले. तेव्हा त्याने रोख नाही तर ऑनलाइन कर असे सांगितले. त्याने जितेंद्र गजेंद्र गिरी यांचे नावावर फोन पे करण्यास सांगितले. त्यानंतर ऑनलाइन पैसे दिले.

हे ही वाचा:

हमासकडून तिसऱ्या टप्प्यात १४ इस्रायली, ३ थाई नागरिकांसह १७ ओलिसांची सुटका!

अवकाळी पावसामुळे वीज कोसळून २० जणांचा मृत्यू!

अवकाळी पावसाच्या हजेरीने मुंबईतील हवेची गुणवत्ता सुधारली

उत्तरकाशीतील बोगद्यात अडकलेल्या मजुरांच्या मदतीला कोल इंडिया

त्यानंतर रात्री झालेला प्रकार त्यांनी कुणालाही सांगितला नाही. सकाळी विवेकने पोट दुखत असल्याचे वडिलांना सांगितले. त्यानंतर त्याला स्थानिक खासगी रुग्णालयात नेले. डॉक्टरांनी कामठी किंवा नागपूर येथे हलविण्याची सल्ला दिला. त्यानुसार नागपूरकडे जात असताना त्याचा वाटेतच सकाळी ९ च्या दरम्यान मृत्यू झाला. विवेकची आई नसून तो एकटाच मुलगा होता. त्याला एक लहान बहीण आहे. या प्रकरणाची तक्रार पोलिसात देण्यात आली असून पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. मनीष भारती हा गुंड प्रवृत्तीचा होमगार्ड असून पोलिसांसोबत वसुली करण्याचे काम तो पाहतो, अशी माहिती आहे.

Exit mobile version