मंत्रिपद देतो म्हणत भामट्यांनी आमदारांकडे मागितले १०० कोटी

मंत्रिपद देतो म्हणत भामट्यांनी आमदारांकडे मागितले १०० कोटी

शिवसेना नेते एकनाथ शिंदे आणि काही आमदारांनी बंड केल्यानंतर राज्यात नवे सरकार स्थापन झाले आहे. मात्र, अजूनही मंत्रिमंडळ विस्तार झाला नसल्याने नव्या सरकारच्या मंत्रिमंडळात कोणाची वर्णी लागणार याकडे साऱ्यांचे लक्ष आहे. अशातच एका राष्ट्रीय पक्षातील आमदाराकडे कॅबिनेट मंत्रीपद मिळवून देण्याच्या नावाखाली थेट १०० कोटी रुपयांची मागणी करण्यात आली आहे. या प्रकरणी मुंबई गुन्हे शाखेने चार जणांना अटक केली आहे.

राज्यातील नव्या सरकारचे लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. याचा फायदा घेत चार जणांनी मंत्रिमंडळात मंत्रिपद मिळवून देण्याच्या नावाखाली तीन आमदारांची फसवणूक करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपींनी आधी आमदारांना फोन करून आपण दिल्लीहून आल्याचे सांगितले. तसेच मोठ्या मंत्रींनी त्यांचा बायोडेटा विचारला आहे, असेही या आमदारांना सांगण्यात आले. यानंतर संबंधित आरोपींनी आमदारांशी दोन ते तीन वेळा फोनवर बोलून सांगितले की, मंत्रिमंडळात मंत्रिपद हवे असेल तर १०० कोटी रुपये द्यावे लागतील. फोनवरील संभाषणानंतर १७ जुलै रोजी आरोपींनी आमदारांची ओबेरॉय हॉटेलमध्ये भेट घेतली होती.

तसेच २० टक्के रक्कम आता द्यावी लागेल आणि उर्वरित मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर द्यावी लागेल, असे या आरोपींनी आमदारांना सांगितले. आरोपींनी सोमवारी आमदारांना नरिमन पॉइंट येथे भेटण्यासाठी बोलावले, त्यानंतर आमदारांनी त्यांना पैसे घेण्यासाठी ओबेरॉय हॉटेलमध्ये नेले. मुंबई पोलिसांना या प्रकरणाची माहिती मिळताच गुन्हे शाखेच्या अँटी एक्स्टॉर्शन सेलने सापळा रचून एका आरोपीला पकडले आणि त्याच्या चौकशीत आणखी तीन आरोपींची नावे समोर आली. त्यानंतर उर्वरित तिघांनाही अटक करण्यात आली.

हे ही वाचा:

राहुल शेवाळे शिवसेनेचे गटनेते, तर भावना गवळी मुख्य प्रतोद

नुपूर शर्मांची हत्या करण्यासाठी आलेल्या पाकिस्तानी नागरिकाच्या मुसक्या आवळल्या

लोकसभा अध्यक्ष संतापले; ही सदस्यांची दुटप्पी वृत्ती

उदयपूरनंतर आता बिहारमध्ये नुपूरप्रकरणी एका तरुणाला भोसकले

या आरोपींची नावे योगेश मधुकर कुलकर्णी, रियाज अल्लाबक्ष शेख, सागर विकास संगवई आणि जाफर अहमद रशीद अहमद उस्मानी अशी आहेत. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

Exit mobile version