मुंब्र्यात वसुली सरकार, पोलिसांनीच व्यापाऱ्याला लुटले

मुंब्र्यात वसुली सरकार, पोलिसांनीच व्यापाऱ्याला लुटले

ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा शहरात एका व्यापाऱ्याकडून पोलिसांनीच सहा कोटी लुटल्याचे धक्कादायक वृत्त समोर आले आहे. या प्रकरणानंतर ठाण्याचे पोलिस आयुक्त जगजीत सिंग यांनी एकाच दिवशी मुंब्रा पोलीस ठाण्यातील तीन अधिकारी आणि सात कर्मचाऱ्यांचे असे १० पोलीस कर्मचाऱ्यांचे निलंबन केले आहे.

मुंब्रा येथील बॉम्बे कॉलनी भागात राहणारे खेळण्यांचे व्यापारी फैजल मेमन यांच्या घरी १२ एप्रिल रोजी रात्री १२.३० च्या सुमारास पोलिसांनी धाड घातली. त्यावेळी फैजल मेमन यांच्या घरातून खेळण्याचे ३० बॉक्स जप्त करण्यात आले. या प्रत्येक बॉक्समध्ये एक कोटी याप्रमाणे ३० बॉक्समध्ये ३० कोटींची रोकड होती. हे ३० बॉक्स मुंब्रा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक (गुन्हे) गीताराम शेवाळे, पोलीस उपनिरीक्षक हर्षद काळे, रविराज मदने यांनी साक्षीदारांच्या उपस्थितीत ताब्यात घेतले. त्यानंतर मेमन आणि हे सर्व बॉक्स मध्यरात्री पोलीस ठाण्यात आणण्यात आले. पुढे पोलिसांनी मेमन यांना दमदाटी करून त्यातील सहा बॉक्स मुंब्रा पोलीस ठाण्यातच स्वतःकडे ठेवून घेतले आणि २४ बॉक्स मेमन यांना परत केले.

मुंब्रा पोलिसांनी धाड टाकून जप्त केलेली रोकड मुंब्रा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कडलग यांच्या केबिनमध्ये मोजण्यात आली. त्यानंतर मुंब्रा पोलिसांनी या प्रकरणाबाबत वाच्यता केली नाही. परंतु, इब्राहिम शेख अशा नावाच्या एका व्यक्तीने या घटनेबाबत ठाण्याच्या पोलीस आयुक्तांसह गृहखात्याला पत्र लिहून या प्रकरणाची माहिती दिली.

हे ही वाचा:

पद्मश्री डॉ. रमाकांत शुक्ला यांचे निधन

अल जझिराच्या महिला पत्रकाराचा गोळीबारात मृत्यू

शिवसेना आमदार रमेश लटके यांचे निधन

कर्नाटकात मशिदीवर फडकला भगवा

त्यानंतर मात्र, ठाणे पोलीस दलात प्रचंड खळबळ उडाली. त्याच दिवशी पोलीस निरीक्षक (गुन्हे) गीताराम शेवाळे यांचा चार्ज काढून घेण्यात आला आणि ठाण्याचे पोलिस आयुक्त जगजीत सिंग यांनी तत्काळ परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे यांना याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले होते.

ठाण्याचे पोलिस आयुक्त जगजीत सिंग यांनी मुंब्रा पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक गीताराम शेवाळे, पोलीस उपनिरीक्षक हर्षद काळे, रविराज मदने यांच्यासह पोलीस नाईक पंकज गायकर, जगदिश गावीत, दिलीप किरपण, प्रवीण कुंभार, अंकुश वैद्य, पोलीस शिपाई ललित महाजन, नीलेश साळुंखे यांना तत्काळ निलंबित केले असून त्यांची खातेनिहाय चौकशी केली जाणार असल्याचे जगजीत सिंग यांनी स्पष्ट केले आहे.

Exit mobile version