बलात्कार पीडित स्पॅनिश महिलेच्या पतीला १० लाखांची भरपाई

या प्रकरणी तीन आरोपींना अटक तर चार आरोपी अद्याप फरार

बलात्कार पीडित स्पॅनिश महिलेच्या पतीला १० लाखांची भरपाई

झारखंडमधील दुमका येथे एका स्पॅनिश महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याची संतापजनक घटना घडली होती. या घटनेनंतर पीडित स्पॅनिश महिलेच्या पतीला सरकारने नुकसान भरपाई दिली आहे. पोलीस उपायुक्तांनी नुकसान भरपाई म्हणून १० लाख रुपये सुपूर्द केले आहेत. यानंतर पोलिसांनी तपास लवकर पूर्ण केल्याबद्दल पतीने त्यांचे आभार मानले आहेत.

या प्रकरणाचा तातडीने तपास केला असून जिल्हा प्रशासनाच्या वतीने त्यांना मदत करत आहोत. पीडित नुकसान भरपाई योजनेंतर्गत त्यांना १० लाख रुपये दिले आहेत. आरोपींना लवकरात लवकर शिक्षा व्हावी यासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती उपायुक्त अंजनेयुलु दोड्डे यांनी दिली आहे.

या प्रकरणात तीन आरोपींना अटक करण्यात आली असून चार आरोपी अद्याप फरार आहेत. त्यांचा तपास सुरू आहे. पीडितेने पोलिसांत दाखल केलेल्या एफआयआरमधील माहितीनुसार, संध्याकाळी सात वाजता त्यांना तंबूच्या बाहेरून आवाज आला. त्यानंतर पती-पत्नी दोघेही तंबूच्या बाहेर आले. दोन जण त्यांच्याशी बोलत होते. काही वेळातच सात जण तिथे पोहोचले. काही वेळाने त्यांनी तिच्या पतीसोबत भांडण सुरू केले आणि नंतर तंबूत घुसून तिच्यावर सामुहिक बलात्कार केला. तसेच आरोपींनी तिच्याकडून ३०० डॉलर, ११ हजार रुपये आणि हिऱ्याची अंगठीही लुटली. या घटनेनंतर पीडितेने स्पेनमधील तिच्या मित्रांना या घटनेची माहिती दिली आणि सोशल मीडियावर पोस्टही शेअर केली. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच गुन्हा दाखल करण्यात आला.

हे ही वाचा..

बेपत्ता खलाशाच्या वडिलांचे पंतप्रधान मोदींना साकडे!

विभागीय शालेय किकबॉक्सिंग स्पर्धेत आलोक, दुर्वाला सुवर्ण

भाजपाने चंदीगड उपमहापौरपदाची निवडणूक जिंकली

नफे सिंग राठी हत्या प्रकरणी गोव्यातून दोन शूटर्सना अटक!

राष्ट्रीय महिला आयोगानेही सामूहिक बलात्कार प्रकरणाची दखल घेतली असून झारखंडमधील कायदा आणि सुव्यवस्थेबाबत चिंता व्यक्त केली आहे. महिला आयोगानेही या घटनेबाबत सविस्तर अहवाल मागवला आहे.

Exit mobile version